ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने बिबट्याचा शोध घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश; सूचना मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल
कोकरूड, ता. शिराळा : कोकरूड परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून बिबट्याचा वावर सातत्याने वाढला असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या साईतेजस्वी देशमुख यांनी तातडीने दखल घेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
बिबट्याचा नेमका ठावठिकाणा शोधण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने संपूर्ण परिसराची पाहणी करावी. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याचा शोध घ्यावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्याचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषद सदस्या साईतेजस्वी देशमुख यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
साईतेजस्वी देशमुख यांनी तातडीने संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिल्यानंतर वन विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील परिस्थितीची पाहणी करून बिबट्याचा शोध घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढत असल्याने नागरिक, शेतकरी तसेच शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वन विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच परिसरात नियमित गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षिततेबाबत आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणीही जिल्हा परिषद सदस्या साईतेजस्वी देशमुख यांनी केली.
नागरिकांच्या जीविताचे संरक्षण आणि परिसरातील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम भूमिका जिल्हा परिषद सदस्या साईतेजस्वी देशमुख यांनी घेतली आहे.










