शिराळा तालुक्यातील सहकारी साखर कारखाना आणि दालमिया सहकारी साखर कारखान्याने अद्याप चालू हंगामातील ऊसदर जाहीर न केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिटन ४२०० रुपये दर मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांनाही हाच दर मिळावा, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली आहे.
या मागणीसाठी शिराळा येथे विविध शेतकरी संघटनांच्या वतीने उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ऊसदराचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
दरम्यान, तहसीलदार श्यामला खोत यांच्या दालनात ऊसदराच्या प्रश्नावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस दोन्ही साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शेतकरी प्रतिनिधी संदीप राजोबा यांनी शेतकऱ्यांची भूमिका ठामपणे मांडत प्रतिटन ४२०० रुपये दर देण्याची मागणी केली.
बैठकीत ऊसदर आणि शेतकऱ्यांना मिळणारा योग्य मोबदला यावर चर्चा झाली. मात्र, चर्चेतून कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर युवा आघाडीचे देवेंद्र धस यांनी आपले आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिराळ्यातील ऊसदराचा प्रश्न अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.
या आंदोलनात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संदीप राजोबा, ॲड. सम्राट शिंदे, ॲड. रवी पाटील, संजय बेले, रामभाऊ पाटील, काका रोकडे, युवा आघाडीचे देवेंद्र धस, अरविंद पाटील, प्रकाश पाटील, संदीप पाटील, रंजीत पाटील, प्रभाकर पाटील, मनहर पटेल, श्रीधर पाटील, नंदकुमार पाटील यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदरासाठी उभारलेल्या आंदोलनाचा दाखला देत शिराळ्यातील शेतकऱ्यांनीही प्रतिटन ४२०० रुपये दराची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा, हीच आंदोलनकर्त्यांची प्रमुख भूमिका आहे.
कोल्हापूरला ४२०० रुपये, तर शिराळ्यात अन्याय का? शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.










