
मांगले (जि. सांगली) शिराळा तालुक्यातील मांगले येथे रविवारी सकाळी अवकाशातून तब्बल सात किलो वजनाचा बर्फाचा मोठा गोळा उसाच्या शेतात कोसळल्याची आश्चर्यकारक घटना घडली. मोरणा नदीकाठावरील समीर रमेश कुलकर्णी यांच्या शेतात सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
प्रचंड वेगाने आणि मोठचा आवाजासह बर्फाचा गोळा जमिनीवर आदळल्याने शेतात मोठा खड्डा पडला. विशेष म्हणजे, सहा तासांनंतरही बर्फ पूर्णपणे वितळला नव्हता. या दुर्मिळ घटनेमुळे परिसरात आश्चर्य आणि
कुतूहल व्यक्त होत आहे.
मांगले येथील मोरणा नदीकाठावर समीर कुलकर्णी यांचे उसाचे शेत आहे. रविवारी सकाळी गावडे हे शेतात ठिबक सिंचनाच्या पाइप पसरत होते. त्यावेळी त्यांना आकाशातून ड्रोनसारखी एखादी वस्तू खाली येताना दिसली.
काही क्षणांतच ही वस्तू प्रचंड वेगाने कुलकर्णी यांच्या उसाच्या शेतात आदळली. त्याचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील शेतकरीही हादरले. आवाजाच्या दिशेने धाव घेतल्यानंतर शेतात मोठा खड्डा पडल्याचे आणि त्यामध्ये बर्फाचा मोठा गोळा फुटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसले. या गोळ्याचे वजन अंदाजे सात किलो असल्याचे सांगण्यात आले.
मांगले येथे अवकाशातून उसाच्या शेतात पडलेला बर्फाचा गोळा.
बर्फाचा गोळा पडल्याने शेतात तयार झालेला खड्डा.
सहा तास उलटूनही तो पूर्णपणे वितळला नाही
जमिनीत घुसलेला बर्फ बाहेर काढण्यात आला. इतर बर्फाच्या तुलनेत तो हलका असल्याचे जाणवले. विशेष म्हणजे, सहा तास उलटूनही तो पूर्णपणे वितळला नव्हता. सध्या धुके किंवा कडाक्याची थंडी नसतांना तसेच उन्हाळ्यासारखे वातावरण असताना आकाशातून बर्फाचा गोळा पडल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे..









