
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी (१६ नोव्हेंबर) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेत कथित ‘मफलरमॅन’चा फोटो माध्यमांसमोर सादर केला. या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात प्रश्न उपस्थित करत होते. या प्रकरणात संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न करणारा ‘मफलरमॅन’ कोण, याबाबत त्यांनी उत्सुकता निर्माण केली होती. अखेर पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मफलर घातलेला फोटो दाखवला.
रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, हा फोटो जयपूर येथे आयोजित एका लग्नसोहळ्यातील आहे. या कार्यक्रमात VSR एव्हिएशनशी संबंधित व्यक्ती आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. VSR कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांना वाचवण्यासाठी राज्यातील काही प्रभावशाली व्यक्ती प्रयत्न करत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
फडणवीसांचा अपघाताशी थेट संबंध असल्याचा आरोप नाही!
या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले. देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवार यांच्या विमान अपघाताशी किंवा कथित घातपाताशी थेट संबंध असल्याचा आपण आरोप करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अपघाताशी संबंधित VSR कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
CBI चौकशीची मागणी पुन्हा ऐरणीवर
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास अद्याप समाधानकारक पद्धतीने होत नसल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी CBI चौकशीची मागणी केली. VSR कंपनीचे आर्थिक व्यवहार, संबंधित व्यक्तींचे संबंध आणि विमान अपघाताशी निगडित सर्व बाबींची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
भाजपकडून रोहित पवारांना प्रत्युत्तर
रोहित पवारांच्या आरोपांनंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांच्यावर टीका केली. संबंधित विमान कंपनी अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्ष आणि सरकारांना विमानसेवा पुरवत असल्याचे सांगत, केवळ एका फोटोच्या आधारे आरोप करणे चुकीचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, रोहित पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि भाजपकडून देण्यात आलेले प्रत्युत्तर यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
आता या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार काय भूमिका घेणार? तसेच तपास यंत्रणांकडून पुढे कोणती कारवाई केली जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
टीप : रोहित पवार यांनी केलेले आरोप आणि त्यावर भाजपने दिलेले प्रत्युत्तर ही संबंधित पक्षांची भूमिका आहे. या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.










