हैदराबाद : वृत्तसेवा
ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ॲपच्या माध्यमातून होणारी फसवणूक, धमकावणे आणि मानसिक छळ यांचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. अवघ्या ४० हजार रुपयांच्या कर्जाच्या परतफेडीवरून होणाऱ्या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून हैदराबादमध्ये एका ३१ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुदावथ श्रीनू असे मृत कॉन्स्टेबलचे नाव असून, या घटनेमुळे बेकायदेशीर डिजिटल कर्ज ॲपच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनू हे कोंडापूर बटालियनमध्ये कार्यरत होते. ते कुटुंबासह पहाडीशरीफ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हर्षगुडा गावात राहत होते. चार महिन्यांपूर्वी आर्थिक अडचणीमुळे त्यांनी एका मोबाईल लोन ॲपवरून ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, ठरलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड न झाल्याने ॲप ऑपरेटरकडून त्यांना वारंवार फोन करून त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे.
पत्नीचे मॉर्फ फोटो व्हायरल करण्याची धमकी
कर्जाच्या वसुलीसाठी ऑपरेटरकडून सतत धमकावले जात होते. दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान हा त्रास अधिकच वाढल्याचे सांगण्यात येते. दर तासाला फोन करून पैसे भरण्यासाठी दबाव आणला जात होता. पैसे न दिल्यास श्रीनू आणि त्यांच्या पत्नीचे मॉर्फ केलेले आक्षेपार्ह फोटो नातेवाईक तसेच गावातील नागरिकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली जात होती.
या सततच्या मानसिक छळामुळे श्रीनू यांनी ९ नोव्हेंबर रोजी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पहाडीशरीफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित लोन ॲप ऑपरेटरचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे.
बेकायदेशीर लोन ॲपच्या जाळ्यापासून सावध राहण्याची गरज
कर्ज देण्याच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, मोबाईलमधील संपर्क क्रमांक आणि छायाचित्रांचा गैरवापर करून धमकावण्याचे प्रकार चिंताजनक ठरत आहेत. विशेषतः मॉर्फ फोटो तयार करून बदनामी करण्याची भीती दाखवणे हा गंभीर सायबर गुन्हा आहे.
या घटनेने ऑनलाइन कर्ज ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या छळाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा बेकायदेशीर ॲपविरोधात कठोर कारवाई, सायबर गुन्हेगारांचा शोध आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा : अनोळखी लोन ॲप डाउनलोड करू नका. धमकी किंवा ब्लॅकमेलिंग झाल्यास पैसे देण्यासाठी दबावाखाली निर्णय घेऊ नका. पुरावे जतन करून सायबर हेल्पलाइन १९३० किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.










