Edition

लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचे निधन; वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलेच्या क्षेत्रावर शोककळा; चार दशकांच्या कलाप्रवासाचा अंत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे | प्रतिनिधी
मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यविश्व आणि महाराष्ट्राच्या लोककलेला आपल्या अभिनयाने व लावणीने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माळेगाव येथे जन्मलेल्या मधू कांबीकर यांना लहानपणापासूनच लोककलेचा वारसा लाभला. लावणी आणि तमाशाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कलाप्रवासाला सुरुवात केली. पुढे रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत प्रवेश करत त्यांनी अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण केली. चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी ७५ पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले.
‘गाढवाचं लग्न’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘वस्त्रहरण’, ‘शापित’, ‘झपाटलेला’, ‘माझा छकुला’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘एक होता विदूषक’ आणि ‘मुक्ता’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘शापित’मधील अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर मराठी पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले. २०१८ मध्ये त्यांना ‘झी चित्र गौरव जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
२७ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे लावणी सादर केल्यानंतर त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्या कलाक्षेत्रापासून दूर होत्या.
त्यांच्या निधनाने मराठी लोककला आणि चित्रपटसृष्टीतील एका प्रतिभावान कलावंताच्या प्रदीर्घ कारकिर्दीची अखेर झाली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!