
कोल्हापूर:प्रतिनिधी – उदय साळुंखे
निधीअभावी ठेकेदाराकडून बंद करण्यात आलेले हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ तात्काळ सुरू करावेत, अन्यथा ढोल वाजवून अधिकाऱ्यांना जागे करणे आणि आरोग्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात एकूण १४ ‘आपला दवाखाना’ केंद्र सुरू होती. त्यापैकी १) लोणार वसाहत (शाहू मिल कॉलनी), २) जिवबानाना पार्क, ३) कनाननगर, ४) राजेंद्रनगर झोपडपट्टी आणि ५) ब्रह्मपुरी टेकडी येथील पाच दवाखान्यांची सेवा पुरवण्याची जबाबदारी खाजगी ‘एच.एस.सी.सी. इंडिया प्रा. लि.’ या कंपनीकडे होती. मात्र, निधीअभावी ही पाचही केंद्रे १ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली आहेत.
हे दवाखाने दुपारी २ ते रात्री १० या वेळेत सुरू राहत असल्याने दिवसभर मोलमजुरी व काम करून सायंकाळी उपचार घेण्यासाठी येणाऱ्या कष्टकरी, कामगार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार होता. तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत व दर्जेदार औषधोपचार मिळत होते. विशेषतः लोणार वसाहत येथील दवाखान्यात उचगाव, गडमुडशिंगी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी आदी परिसरांतून दररोज शंभरहून अधिक रुग्ण उपचारासाठी येत होते. दवाखाने बंद झाल्यामुळे गोरगरिबांची मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागून सत्तेत आलेल्यांनी आज त्यांच्याच नावाचा दवाखाना बंद पडताना दुर्लक्ष केले आहे. आरोग्यमंत्री याच जिल्ह्यातील असताना शहरातील पाच ‘आपला दवाखाना’ केंद्रे बंद पडणे अत्यंत गंभीर बाब आहे. याला महायुती सरकार जबाबदार असून, तातडीने दवाखाने सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
आरोग्य सेवा उपसंचालक यांच्या वतीने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनंदा गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले व हा विषय तातडीने शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र हातात घेतले होते. या प्रसंगी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, शहरप्रमुख विशाल देवकुळे, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, राजू सांगावकर, राहुल गिरुले, संदीप दळवी, हर्षल पाटील, दिपाली शिंदे, जितू कुबडे, दत्ता फराकटे, सचिन नागटिळक, बाळासो नलवडे, योगेश लोहार, दीपक पोपटानी, दीपक धिंग, सुनील पारपाणी, कैलास जाधव, बाबुराव पाटील, आबा जाधव, रंगराव पाटील, राहुल माने, सुबहान फुलवाले यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









