
शिंगणापूर प्रतिनिधी – विवेक पाटील, शहरातील भर वस्तीमध्ये बिबट्या सारख्या हिंसक प्राण्याचे दर्शन होणे ही बाब खूपच गंभीर बनली आहे. कोल्हापूर शहरात आत्तापर्यंत बिबट्या शहरात घुसल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे नागरीकांसह वन विभागाची तारांबळच उडाली. असाच गुंगारा १२ दिवसापासून चंबुखडी टाकी – शिंगणापूर बंधारा परिसरात आढळलेला बिबट्या देत आहे.
शिंगणापूर चिखली मार्गावर शेतवडीत प्रथम बिबट्या आढळला होता. त्यानंतर वनविभागाने मोहिम हाती घेतली. हा बिबट्या सुतारमळा, लक्षतीर्थ वसाहत परिसरात दिसून आल्याच्याही चर्चा रंगल्या. यानंतर वनविभागाने या ठिकाणी तपासणी मोहिमही राबवली. पण त्याचा कोठेच ठाव – ठिकाणी लागला नाही. शनिवारी (ता.१०) रात्री दीड वाजता हणमंतवाडी कडे जाणाऱ्या ट्रॅक्टरचालकाला बिबट्या चंबुखडी येथे दिसून आला. त्याच दिवशी पहाटे ६ च्या सुमारास चंबुखडी टेकडी परिसरातील ‘योगेश माने’ यांच्या निवासस्थानाच्या दारात बिबट्याचे दर्शन झाल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. मागील आठवड्यात बिबट्याने त्यांच्या पाळीव बदकाला भक्ष केल्याची माहिती ‘दत्तात्रय माने’ यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
घटनेची माहिती मिळताच आज (ता.१२) दुपारी १२ नंतर वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ‘वनरक्षक’ विदेश तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली चंबुखडी टाकी परिसरात २ तास शोध मोहिम रावबिली पण बिबट्या आढळून आला नाही. आजपासून पुढील पाच दिवस ड्रोन च्या माध्यमातून शोधमोहीम राबविणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.
यामध्ये उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, वनपाल आप्पासाहेब बुरटे, वनरक्षक विदेश तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुपर्यवेक्षक अमित कुंभार, वन्यजीव बचाव पथक चे आशुतोष सूर्यवंशी, राकेश शिखरे, वैभव आवळे हे सहभाग घेणार आहेत.
प्रतिक्रिया
आजकाल विविध प्राण्यांचे ‘एआय’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे खात्री न करता नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्या परिसरात जंगली प्राणी आढळून आल्यास ‘१९२६’ या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी माहिती द्यावी. बिबट्या सापडत नाही तोपर्यंत नागरिकांनी सतर्क राहावे.
– विदेश तांबारे, वनरक्षक, करवीर
फोटो : कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक – ८ अंतर्गत येणाऱ्या ‘दत्तनगर’ मध्ये ‘दत्तात्रय माने’ यांच्या घराच्या अंगणात सीसीटीव्हीत बिबट्या कैद झाला.










