Edition

सरकार कुटुंबीयांच्या समर्थनार्थ चिकुर्डेत सर्वपक्षीय, सर्वधर्मीय ग्रामस्थांचा ऐतिहासिक मेळावा ‘सरकार कुटुंबावर संकट म्हणजे संपूर्ण गावावर संकट’; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, एकजुटीने पाठीशी उभे राहण्याचा निर्धार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चिकुर्डे प्रतिनिधी – वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील गावचे नेते श्रीमंत सोमराज देशमुख सरकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समर्थनार्थ गावातील सर्वपक्षीय व सर्वधर्मीय ग्रामस्थांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. येथील शिवपार्वती कार्यालयात झालेल्या या मेळाव्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध समाजांचे प्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकार कुटुंबीयांप्रती आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला. तसेच कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
सरकार कुटुंबीयांवर सुरू असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यात गावातील विविध समाजघटकांनी एकत्र येत आपली भूमिका मांडली. अनेक वक्त्यांनी सरकार कुटुंबाने गावाच्या विकासासाठी, विविध समाजांच्या गरजांसाठी आणि सार्वजनिक सुविधांसाठी केलेल्या जमीनदानाचा उल्लेख केला. त्यांच्यावरील आरोपांबाबत न्यायप्रक्रियेचा आदर राखत सत्य समोर येण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
‘सरकार कुटुंबावर संकट म्हणजे संपूर्ण गावावर संकट’
दलित संघटनेचे नेते अतुल चव्हाण म्हणाले, सरकार घराण्याबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. या कुटुंबाशी पिढ्यान्‌पिढ्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्यावर आलेले संकट म्हणजे संपूर्ण गावावर संकट आल्यासारखी परिस्थिती आहे. मातंग समाजासाठी या कुटुंबाचे मोठे योगदान असून, तक्रारदार कुटुंबाचा अपवाद वगळता समाजातील बहुतांश लोक सरकार कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शिवसेनेचे वाळवा तालुकाध्यक्ष सागर मलगुंडे यांनी सरकार कुटुंबीयांच्या समर्थनार्थ बोलताना सोमराज देशमुख सरकार यांच्या दानशूर वृत्तीचा गौरव केला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक नेते पाहिले; मात्र त्यांच्यासारखा निर्मळ मनाचा आणि दानशूर नेता पाहिला नसल्याचे ते म्हणाले. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर होत असलेल्या जातिवाद आणि जमीनवाटपाशी संबंधित आरोपांचा त्यांनी निषेध केला. संबंधित प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत ग्रामस्थांनी सरकार कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
सार्वजनिक सुविधांसाठी जमीनदानाचा उल्लेख
माजी सरपंच चांदसो तांबोळी यांनी गावाच्या विकासातील सरकार कुटुंबीयांच्या योगदानाची माहिती दिली. गावात विविध समाजांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी, सुसज्ज आरोग्य केंद्र, पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी भव्य शाळा आणि जनावरांचा दवाखाना अशा सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या सुविधांसाठी दोन एकरांपासून ते अकरा एकरांपर्यंत जमीन सरकार कुटुंबीयांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, मी स्वतः या कुटुंबाच्या सहवासात २८ वर्षे आहे. सरपंच असताना ग्रामसचिवालयासाठी जागेची गरज असल्याचे सांगितल्यानंतर देशमुख सरकार यांनी तत्काळ जागा उपलब्ध करून दिली. गावातील विविध समाजांच्या गरजा ओळखून जमीन उपलब्ध करून देणाऱ्या या कुटुंबाचे योगदान विसरता येणार नाही.
उद्योजक अनिल चिवटे यांनीही सरकार कुटुंबीयांनी गावासाठी केलेल्या कामांचा उल्लेख केला. एका कुटुंबाचा अपवाद वगळता मातंग समाज सरकार कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे सांगत, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
डोंगरवाडीच्या पुनर्वसनातही योगदान
डोंगरवाडी येथील दशरथ लबडे म्हणाले, सरकार कुटुंबाचे आमच्या गावाशी गेल्या तीन पिढ्यांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. डोंगरवाडीच्या पुनर्वसनासाठी ३०९ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात या कुटुंबाने महत्त्वाची भूमिका बजावली. अशा दानशूर कुटुंबावर होत असलेल्या आरोपांबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी भविष्यात रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागला, तरी मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
माजी सरपंच प्रतिनिधी अमृत पांढरे यांनी चिकुर्डे हे सत्यशोधक चळवळीचे उगमस्थान असल्याचे सांगितले. गावाच्या विकासासाठी आणि गरजूंसाठी सरकार घराण्याने मोठ्या प्रमाणात जमीन दिली आहे. अशा कुटुंबावर जातिवादाचे आरोप होणे ही गंभीर बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सर्व समाजांना सोबत घेऊन काम केल्याचा गौरव
उद्योजक शहाजी पाटील म्हणाले, गावातील अनेक ज्येष्ठांनी सरकार कुटुंबाच्या मागील पिढ्यांचे काम जवळून पाहिले आहे. बारा बलुतेदारांना सोबत घेऊन काम करण्याची परंपरा या कुटुंबाने जपली. हाच वारसा सोमराज देशमुख बाबा सरकार गेल्या चार दशकांपासून पुढे नेत आहेत. राजकीय विरोधकांबाबतही त्यांनी कधी आकसाची भूमिका घेतली नाही. जात-पात न पाहता सर्व समाजांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची भूमिका राहिली आहे, असे त्यांनी नमूद केले.
संजय कांबळे यांनी सरकार कुटुंबीयांचे बौद्ध समाजाशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध अधोरेखित केले. आपण स्वतः बाबांच्या सहवासात चार वर्षे राहिलो असून, त्यांच्या सामाजिक योगदानाचा अनुभव घेतला आहे. बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे त्यांनी सांगितले.
विशाल पांढरबळे यांनी चांगल्या व्यक्तीवर अन्याय होत असेल, तर त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका व्यक्त केली. दौलत पवार ऊर्फ पापा यांनीही सरकार कुटुंबीयांच्या सामाजिक योगदानाचा उल्लेख करत त्यांच्यावरील आरोपांबाबत निष्पक्षपणे सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली.
संविधान आणि न्यायप्रक्रियेवर विश्वास
प्रा. वैभव बुड्डे म्हणाले, सरकार कुटुंबाचा संविधानावर पूर्ण विश्वास आहे. जमीनप्रकरणी सुरू असलेली कायदेशीर प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने तिचा आदर राखला पाहिजे. या कुटुंबाने समाजासाठी केलेल्या कामाची जाणीव ग्रामस्थांना आहे. विविध समाजांतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहणे, ही या कुटुंबाविषयी असलेल्या जिव्हाळ्याची आणि पाठिंब्याची भावना दर्शवते.
यावेळी बाबासो पवार आणि जयप्रकाश पांढरे यांनीही मनोगत व्यक्त केले. उपस्थित वक्त्यांनी सरकार कुटुंबीयांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत गावातील एकोपा कायम राखण्याचे आवाहन केले.
मेळाव्याचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. वैभव बुड्डे यांनी केले, तर श्रीमंत सोमराज देशमुख सरकार यांनी उपस्थितांचे आभार मानले. विविध समाजघटकांतील नागरिकांच्या उपस्थितीमुळे हा मेळावा गावातील सामाजिक एकजुटीचे प्रदर्शन ठरला.

फोटो ओळी :
1) चिकुर्डे (ता. वाळवा) येथे सरकार कुटुंबीयांच्या समर्थनार्थ आयोजित मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे वाळवा तालुकाध्यक्ष सागर मलगुंडे.
2) चिकुर्डे येथील शिवपार्वती कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय व सर्वधर्मीय मेळाव्यास उपस्थित ग्रामस्थांचा जनसमुदाय.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

एसआयआर अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 99.94 काम पूर्ण बिनचूक मतदान पद्धतीबाबत मतदार जनजागृती करा – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले – एसआयआर कामकाज, पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा घेतला आढावा

traffic tail

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

error: Content is protected !!