कोल्हापूर:प्रतिनिधी उदय साळुंखे,
आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तसेच नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) वतीने गुरुवारी जयसिंगपूर नगरपालिकेवर जोरदार “जवाब दो” आंदोलन करण्यात आले. येत्या ८ दिवसांत या सर्व मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
आरोग्य विभागाचा निष्क्रिय कारभार आणि प्रलंबित मागण्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पालिका परिसर दणाणून सोडला. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी पालिका प्रशासनाला जाब विचारला.
दरम्यान, मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी पालिकेचे जबाबदार अधिकारी आंदोलनस्थळी आले असता आंदोलनकर्त्यांनी “रस्त्यावर खाली बसून चर्चा करा” अशी मागणी केली. मात्र अधिकाऱ्यांनी खाली बसून चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला. प्रशासनाच्या या उदासीन, जनविरोधी आणि आडमुठ्या भूमिकेमुळे उपस्थित आंदोलकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली.
पालिकेच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यासही नकार दिल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी अखेर आपल्या मागण्यांचे निवेदन जयसिंगपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य दारालाच चिकटवून प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “पालिका प्रशासन सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आम्ही दिलेल्या निवेदनावरील मागण्यांवर येत्या ८ दिवसांत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर आरपीआय स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास आम्ही मागे-पुढे पाहणार नाही.”
या ‘जवाब दो’ आंदोलनामध्ये आरपीआयचे जिल्हा युवा अध्यक्ष अविनाश शिंदे, जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर, युवा शहराध्यक्ष सचिन कांबळे, युवा शहर उपाध्यक्ष उमेश मोरे, शामराव देसाई, विजय वायदंडे, चेतन कोलप, रोहन कोळी, बबन शिकलगार, मोमीन जकवान, सुहास कांबळे, चारू कांबळे, अजय पडियार, अंकुश कुरणे, रोहन कांबळे, मनोज सावंत, संजय कांबळे, प्रताप रजपूत, निलेश कामत यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.











