कुरुंदवाड : प्रतिनिधी (राजगोंडा पाटील),
कुरुंदवाड शहरात दहाव्या दिवशी पीर-पंजांच्या मिरवणुका, परस्पर भेटी आणि विसर्जन सोहळा अत्यंत भक्तिभाव, उत्साह आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात पार पडला. शहरातील बाराईमाम, तक्का, कुडेखान, नालसाहेब यांच्यासह विविध भागांतील एकूण २२ पीर-पंजांच्या भेटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पार पडल्या.
भेटींचा सोहळा संपल्यानंतर पीर-पंजांनी शहरातील विविध भागांत जाऊन भाविकांना दर्शन दिले. घरोघरी पूजन, नवस फेड आणि गुळाचा प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मरगुबाई मंदिर, हलसिद्धनाथ मंदिर, पंत मंदिर तसेच गोदड मशिदीत धार्मिक विधी पूर्ण करून पीर-पंजांचे विसर्जन करण्यात आले.कुडेखान-बडेनालसाहेब यांनी हजरत दौलतशाह वली दर्ग्याचे तसेच राजवाड्यातील गणपतीचे दर्शन घेत परंपरेनुसार भेटींच्या कार्यक्रमास प्रारंभ केला.
या अनोख्या परंपरेतून कुरुंदवाडमधील धार्मिक ऐक्य आणि परस्पर सन्मानाची भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली.गुरुवारी रात्री नवव्या ‘खत्तल रात्री’निमित्त अनेक भाविकांनी आपले नवस फेडले. चोगे, मलिदा, रोठ, मोदक यांचा नैवेद्य अर्पण करून पीरांना पटका चढविण्यात आला. विविध मशिदींमध्ये खाई उधळणीचा पारंपरिक विधीही मोठ्या भक्तिभावाने पार पडला. शहरातील माळभाग, सन्मित्र चौक, शिकलगार वाडा, भबिरे मळा, दलित वस्ती, फकीरवाडा, शेळके गल्ली, मोमीन गल्ली, ढेपनपूर आणि महाबुसुभानी दर्गा परिसरात भाविकांनी पीर-पंजांचे पूजन करून दर्शन घेतले.
लोकसहभागामुळे उत्सव शांततेत
मोहरम उत्सवाच्या कालावधीत नागरिक, विविध मंडळे, पत्रकार, पालिका प्रशासनाच्या सहकार्यामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम शिस्तबद्ध व शांततेत पार पडले. पीर-पंजांच्या वेळेवर झालेल्या भेटींमुळे भाविकांना सर्व सोहळ्यांचा आनंद घेता आला. हा उत्सव सामाजिक ऐक्याचा संदेश देत यशस्वीरीत्या संपन्न झाला.सपोनि. संतोष माने.

कुरुंदवाड शहरातील दहाव्या दिवशी राजवाडा येथे कुडेखान-नालसाहेब यांच्या भेटीचा क्षण.











