तेरदाळ : कर्नाटक राज्यात जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र जैन निगम मंडळ स्थापन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी तेरदाळ येथील गुरुकुलात जैन समाजाचे भव्य महामंथन पार पडले. रायबाग, तेरदाळ, जमखंडी, अथणी, कागवाड, चिक्कोडी यांसह परिसरातील विविध गावांतील हजारो जैन समाजबांधव या सभेसाठी एकत्र आले होते. जैन निगम मंडळ स्थापनेच्या मागणीसाठी समाजाने एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रसंत आचार्य श्री १०८ गुणधरनंदी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तसेच स्वस्तिश्री धर्मसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महामंथन सभा पार पडली. या सभेला सुमारे पाच ते सहा हजार जैन समाजबांधव, विविध सामाजिक व धार्मिक संस्थांचे पदाधिकारी आणि समित्यांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेमध्ये जैन समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जैन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र जैन निगम मंडळाची स्थापना होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याला नव्याने बळ देत आगामी आंदोलनाची दिशा आणि पुढील कार्यवाही निश्चित करण्यात आली.
आमदारांना निवेदन; ४ डिसेंबरपासून महापदयात्रा
आगामी दहा दिवसांत परिसरातील आमदारांची भेट घेऊन जैन निगम मंडळ स्थापनेसह समाजाच्या विविध मागण्यांबाबत निवेदन देण्याचे सभेत ठरविण्यात आले. त्यानंतर ४ डिसेंबरपासून महापदयात्रा सुरू करण्यात येणार असून, पुढील टप्प्यात कर्नाटक विधानसभेसमोर सत्याग्रह आंदोलन करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
निगम मंडळ स्थापन न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
यावेळी आचार्य श्री १०८ गुणधरनंदी महाराज यांनी कर्नाटक सरकारने पुढील दहा दिवसांत जैन निगम मंडळाची स्थापना न केल्यास आमरण उपोषण करून देहत्याग करण्याचा कठोर इशारा दिला. महाराजांच्या या भूमिकेमुळे सभेत उपस्थित समाजबांधवांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.
मात्र, उपस्थित प्रमुख मान्यवरांनी महाराजांना या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. “महाराज, आम्ही तुम्हाला देहत्याग करू देणार नाही. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. सरकारने यापूर्वीच निगम मंडळ स्थापनेबाबत आश्वासन दिले असून, आतापर्यंत सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे,” असे सांगून त्यांनी महाराजांना पाठिंबा व्यक्त केला व समजूत काढली.
आचार्य श्री यांनी जैन समाजाच्या या लढ्याला पाठिंबा देणाऱ्या सर्व प्रमुख मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. गुरुकुलच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व मान्यवर व समाजबांधवांचे स्वागत केले.
जैन समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी समाजातील सर्व घटकांनी मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने पुढे यावे, असा संदेश या महामंथन सभेतून देण्यात आला. शेवटी उपस्थितांचे अभिनंदन करून प्रसाद वितरणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अनिलकुमार डेक्कण्णवर, सदलगा.









