
गांधीनगर:प्रतिनिधी-
उदय साळुंखे
गोवा येथे झालेल्या ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धेत, गडमुडशिंगी (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील १६ वर्षीय शिवेंद्र तानाजी पाटीलने दोन सुवर्णपदके पटकावून नवा इतिहास रचला आहे.
ज्युनियर पुरुष आणि युवा पुरुष अशा दोन्ही गटांत अव्वल स्थान पटकावत, शिवेंद्रने आपल्या अचूक नेमबाजीची चुणूक दाखवली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा सुपुत्र असलेला शिवेंद्र, कोल्हापूरच्या शांतिनिकेतनमध्ये शिक्षण घेत आहे.
प्रशिक्षक इंद्रजीत पाटील आणि सत्यजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हे यश मिळविले. शिवेंद्रच्या या दुहेरी सुवर्णयशामुळे गडमुडशिंगी गावात आनंदाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी त्याची गावातून भव्य मिरवणूक काढत जल्लोष केला.









