
मेणीखोरा परिसरातील गावांना २४ तास अखंडित मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी मेणी फाटा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील चारही ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, महिला, युवक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मेणीखोरा परिसरात मोबाईल नेटवर्कची समस्या अनेक दिवसांपासून गंभीर बनली आहे. आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन शिक्षण, बँकिंग व्यवहार, सातबारा उतारे, ई-केवायसी, गॅस बुकिंग तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी इंटरनेट आवश्यक असताना नागरिकांना साधे मोबाईल नेटवर्कही मिळत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन व्यवहारही प्रभावित होत आहेत.
या प्रश्नाबाबत प्रशासन आणि बीएसएनएल विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना झाल्या नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. मेणी फाटा येथे तीन तास रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी तानाजीराव सावंत यांनी, मेणीखोऱ्यातील नागरिकांना केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्षात २४ तास अखंडित मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सुविधा मिळाली पाहिजे. नेटवर्कची कायमस्वरूपी व्यवस्था होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम इशारा दिला.
‘नेटवर्क हा आमचा हक्क आहे, मेहरबानी नाही’, ‘डिजिटल इंडिया म्हणता, मग मेणीखोरा भारतात नाही का?’ आणि ‘२४ तास नेटवर्क मिळालेच पाहिजे’, अशा घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले. मेणीखोऱ्याचा नेटवर्क प्रश्न हा केवळ मोबाईलपुरता मर्यादित नसून शिक्षण, शेती, रोजगार आणि आरोग्याशी संबंधित मूलभूत सुविधांचा प्रश्न असल्याने प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.










