विशालक्रांती न्यूज चिकोडी तालुका प्रतिनिधी अमर माने.
इचलकरंजी येथे मधू स्वप्न वधू-वर सूचक केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कोळी समाजाचा चौथा वधू-वर मेळावा मोठ्या उत्साहात आणि अलोट गर्दीत संपन्न झाला. या मेळाव्याला महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील कोळी समाजातील उपवर वधू-वर तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मेळाव्याचे संस्थापक व आयोजक श्री. शशिकांत कोळी सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, मुला-मुलींचे विवाह योग्य वयात आणि वेळेत पार पाडण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा. विवाह जुळवताना अवास्तव अपेक्षा न ठेवता एकमेकांना समजून घेऊन आवश्यक तडजोड केल्यास विवाह जुळणे अधिक सोपे होईल,असे महत्त्वपूर्ण आवाहन केले.
या शानदार मेळाव्याचे अध्यक्षस्थान शिरोळ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. भारती कोळी मॅडम यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर संस्थापक-आयोजक श्री. शशिकांत कोळी सर यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत केले.
प्रास्ताविकात शशिकांत कोळी सर यांनी मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. आजच्या काळात मुला-मुलींचे विवाह जुळवताना अनेक अडचणी निर्माण होत असून, अपेक्षांचे ओझे वाढल्यामुळे विवाह ठरण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुलगा किंवा मुलगी कितीही उच्चशिक्षित असली अथवा विविध क्षेत्रांत प्रगती केलेली असली, तरी जीवनसाथी निवडताना आई-वडिलांचा सल्ला, अनुभव आणि मार्गदर्शन यांना विशेष महत्त्व द्यावे. विवाह जुळवताना केवळ अपेक्षांचा विचार न करता परस्पर समजूतदारपणा, विचारांची देवाणघेवाण आणि कौटुंबिक जुळवाजुळव यांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. अरुण कोळी (बोरपाडळेकर), पांडुरंग कोळी, रामभाऊ परचुंडे तसेच सांगली येथून उपस्थित असलेले संकेत आलासे यांनीही उपवर मुला-मुलींसह पालकांना विवाहविषयक मार्गदर्शन केले. समाजातील तरुण-तरुणींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी अशा मेळाव्यांची मोठी मदत होत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात गटशिक्षणाधिकारी सौ. भारती कोळी मॅडम यांनी शशिकांत कोळी सर यांच्या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
ना पैशासाठी, ना नावासाठी – हा मेळावा फक्त समाजासाठी’ या उदात्त भावनेतून त्यांनी हा उपक्रम सुरू केला असून, समाजातील विवाहयोग्य मुला-मुलींचे विवाह जुळवण्यासाठी ते करत असलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच त्यांच्या या सामाजिक कार्याचे संपूर्ण समाजाच्या वतीने अभिनंदन केले.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कोळी समाजातील शेकडो नागरिक, तरुण-तरुणी आणि पालकांच्या उपस्थितीमुळे मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजातील विवाहयोग्य मुला-मुलींना एकाच व्यासपीठावर येऊन योग्य जोडीदार निवडण्याची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम समाजासाठी उपयुक्त ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
हा मेळावा यशस्वी व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी सौ. अर्चना कोळी, सौ. अल्पना कोळी, सचिन भोजे, समीक्षा भोजे, संकेत कोळी, शिवानी कोळी, विश्वजीत कोळी, सुरेंद्र कोळी, दीपाली कोळी आणि श्री. विनायक कोळी यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री.सुरेंद्र कोळी यांनी उपस्थित मान्यवर, पालक, वधू-वर आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजातील विवाहयोग्य तरुण-तरुणींना योग्य जीवनसाथी मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.










