अजितदादांविषयी संपूर्ण महाराष्ट्राला आदर आहे. त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पुण्यात पार पडत असताना रोहित पवार यांनी केलेले वक्तव्य म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. ते ईश्वरपूर येथे बोलत होते.
यावेळी रोहित पवार यांच्यावर टीका करताना खोत म्हणाले, “शेतामध्ये पेरणी केली की पीक कशाचे येणार, हे कळते. मात्र, इथे सहा महिन्यांत संशयाचे पीक बदलत आहे. या संशयाचे बीज नेमके काय आहे, हे रोहित पवार यांनी महाराष्ट्राला स्पष्ट सांगावे.”
रोहित पवार यांची सुरू असलेली धडपड ही खुर्चीसाठी असून, राजकारणाच्या पटलावर केविलवाणी आणि कपटनीतीची कूटनीती राबविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, त्यांचे हे प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाहीत, असेही खोत यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “देवाभाऊ हे कलियुगातील अभिमन्यू आहेत, एवढे लक्षात ठेवा. ते तुमच्या कोणत्याही चक्रव्यूहात अडकणार नाहीत.” अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.










