
*विशालक्रांती न्यूज.*
*प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.*
नणदी( ता.चिकोडी )येथील चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना, चिक्कोडी व यु.पी.एल. कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ऊस विकास योजनेला उत्स्फूर्त यश मिळत आहे. या योजनेअंतर्गत नणदी गावचे शेतकरी श्री. रवींद्र मारुती धर्मोजे व बेडकिहाळ गावचे शेतकरी श्री. चंद्रकांत आबासो चव्हाण यांनी आपल्या शेतात एकरी तब्बल १०० मेट्रिक टन उसाचे उत्पादन घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
कारखान्याच्या ऊस विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली तसेच कारखान्याच्या किसान बाजारमार्फत यु.पी.एल. कंपनीच्या विविध उत्पादनांचा वापर, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित ऊस शेती पद्धतींचा अवलंब करून या दोन्ही शेतकऱ्यांनी Co-86032 या ऊस जातीची लागवड केली आहे. सध्या या शेतकऱ्यांकडून उत्पादित ऊस कारखान्याला पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे दोन्ही शेतकऱ्यांनी प्रति एकर १०० मेट्रिक टन उत्पादन मिळवून परिसरातील ऊस उत्पादकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
या यशाची दखल घेत कारखान्याचे वरिष्ठ प्रधान व्यवस्थापक श्री. एन. एस. हिरेमठ यांनी दोन्ही शेतकऱ्यांच्या शेताला प्रत्यक्ष भेट देऊन ऊस पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या मेहनतीचे व आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक केले.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. हिरेमठ म्हणाले की, कारखान्याचे शिल्पकार, राज्यसभेचे माजी सदस्य व के.एल.ई. शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे संचालक श्री. अमित कोरे यांच्या इच्छेनुसार आणि कारखान्याचे अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन कोरे यांच्या निर्देशानुसार कारखान्याकडून ऊस विकास योजनेला विशेष प्राधान्य दिले जात आहे.
शेतकऱ्यांनी एकरी १०० मेट्रिक टन ऊस उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी कारखान्याच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. ऊस उत्पादनात वाढ झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्याबरोबरच कारखान्यालाही पुरेसा ऊस उपलब्ध होऊन दोघांचाही फायदा होणार आहे. त्यामुळे परिसरातील सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊस विकास योजनांचा लाभ घेऊन आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी यु.पी.एल. कंपनीचे सुरजकुमार अंगडी, आकाश मुळ्ळूर, कारखान्याचे किसान बाजार व्यवस्थापक राहुल इचलकरंजे, ऊस विकास पर्यवेक्षक सचिन मोपगार, ऊस पर्यवेक्षक एस. डी. पाटील, यू. बी. कागले, ऊस विकास पर्यवेक्षक आर. ए. भीवसे, एम. एस. पाटील आदींसह कारखान्याचे स्थानिक कर्मचारी उपस्थित होते.
तसेच नणदी गावचे शेतकरी कृष्णा कोकणे, अनिल जीरगे, बेडकिहाळ गावचे शेतकरी मलगौडा सुळकुडे, शरद दनाप, वसंत चव्हाण यांच्यासह परिसरातील विविध गावांतील ज्येष्ठ नागरिक व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
एकरी १०० टन ऊस उत्पादनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या या दोन्ही शेतकऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, आधुनिक तंत्रज्ञान व योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ऊस शेतीत अधिक उत्पादन घेण्याची प्रेरणा परिसरातील शेतकऱ्यांना मिळत आहे.










