जनावरांना वर्षभर सकस व पौष्टिक चारा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम.
सेलू प्रतिनिधी डाॅ शिवाजी शिंदे, रवळगाव जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत डासाळा येथे कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनेंतर्गत पशुपालकांना चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले. जनावरांना वर्षभर हिरवा, सकस व दर्जेदार चारा उपलब्ध व्हावा आणि पशुपालकांना चारा उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते पशुपालकांना चारा बियाण्यांचे वितरण करण्यात आले.तालुक्यात पशुपालन हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे जनावरांना वर्षभर पुरेसा व पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. चाऱ्याची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम पशुधनाच्या आरोग्यावर तसेच दुग्धोत्पादनावर होतो. ही बाब लक्षात घेऊन पशुपालकांनी स्वतःच्या शेतामध्ये चारा पिकांची लागवड करावी, यासाठी शासनाच्या योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे.
चारा बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात हिरवा व पौष्टिक चारा उपलब्ध करून घेता येणार असून, बाजारातून चारा खरेदी करण्यावरील खर्चातही बचत होणार आहे. तसेच पशुधनाचे आरोग्य चांगले राहून दुग्धोत्पादन वाढण्यास मदत होईल. या योजनेचा अधिकाधिक पशुपालकांनी लाभ घेऊन चारा पिकांची लागवड करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्य प्रभाकर गजमल, रामराव गजमल, अशोकराव गजमल, दत्ताराव चव्हाण, लाड नांद्रा येथील सरपंच माऊली निसर्गन, बबन नाना गजमल, उपसरपंच अनिल गजमल, भगीरथ गजमल, इद्रिस शेख, जगणं नाना गजमल यांच्यासह परिसरातील शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










