Edition

२९ जूनला श्री संत गजानन महाराज पालखीचे रिसोड तालुक्यात आगमन; दापुरी खुर्दपासून रिसोडपर्यंत भक्तिमय वातावरण, उत्साहात स्वागत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी – संतोष भालेराव, वाशिम : श्रीक्षेत्र शेगाव येथून श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे २१ जून २०२६ रोजी प्रस्थान झाले असून, ही पालखी २९ जून रोजी रिसोड तालुक्यात दाखल होणार आहे. पालखीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, ग्रामस्थ, नगरपरिषद, व्यापारी व विविध सेवाभावी संस्थांकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे.
२९ जून रोजी सकाळी पालखीचे दापुरी खुर्द येथे आगमन होणार असून, श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी पोलीस पाटील, सरपंच, ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतील. वारकरी भक्तांसाठी चहा, नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मसलापेनपर्यंत शिरपूर पोलीस पथक, तर किनखेडा ते रिसोड शहर हद्दीपर्यंत रिसोड पोलीस स्टेशनचे पथक तैनात करण्यात आले आहे. पालखीसोबत रुग्णवाहिका व वैद्यकीय अधिकारी यांचे पथकही कार्यरत राहणार आहे.
दुपारी पालखीचे चिंचाबापेन येथील शाळेजवळ आगमन होणार असून, तेथेही पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येईल. वारकरी भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर पालखीचा रात्रीचा मुक्काम मसलापेन येथे राहणार असून, भोजन, निवास व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
३० जून रोजी सकाळी पालखी किनखेडा, लिंगा कोतवाल फाटा, खडकी सदार फाटा, वाडी रायताळ फाटा, देगाव फाटा, पळसखेडा फाटा व बिबखेडा मार्गे रिसोड शहराकडे मार्गस्थ होणार आहे. या सर्व ठिकाणी पालखीचे दर्शन व स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, गावकऱ्यांकडून वारकरी भक्तांसाठी चहा, नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
३० जून रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या दरम्यान पालखीचे रिसोड शहरात आगमन होणार आहे. मालेगाव नाका, लोणी फाटा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सराफ लाईन, अमरदासबाबा मंदिर, आप्पास्वामी मंदिर, शिवाजी चौक व सिव्हिल लाईन या मार्गाने पालखीचे वाजत-गाजत स्वागत करण्यात येणार आहे. शहरातील व्यापारी, सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांकडून स्वागत कमानी उभारण्यात येत असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पालखी मार्गावरील रस्त्यावर कोणत्याही प्रकारची वाहने उभी करू नयेत, जेणेकरून वारकरी व भाविकांना अडथळा निर्माण होणार नाही, अशा सूचना रिसोड पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत. नगरपरिषदेच्या वतीने पालखी मार्गावरील पथदिवे सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पालखीचा रात्रीचा मुक्काम कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड येथे राहणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी सुरळीत राहावी यासाठी स्वतंत्र बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भाविकांना पोलिसांचे आवाहन
पालखी सोहळ्यादरम्यान महिलांनी तसेच भाविकांनी आपल्या अंगावरील दागिने, मोबाईल, पाकीट व इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात. दुचाकी वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत. गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोर सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा चोरीची घटना निदर्शनास आल्यास तात्काळ रिसोड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी केले आहे.
१ जुलै रोजी पहाटे सुमारे ४ वाजता श्री संत गजानन महाराज पालखीचे रिसोड येथून मराठवाड्यातील सेनगाव मार्गे पुढील प्रवासासाठी प्रस्थान होणार असून, २३ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पालखीचे आगमन होणार असल्याची माहिती गुप्त संचार विभागामार्फत प्राप्त झाली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!