कोल्हापूर, दि. १६ ऑक्टोबर :
वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात सातत्याने नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे, संशोधन व नवोन्मेषाला प्राधान्य देणे आणि अपयशाची भीती न बाळगता नव्या संधींचा स्वीकार करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समस्या निवारणाच्या क्षमतेच्या बळावर विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर नेतृत्व करावे, असे प्रतिपादन भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), नागपूरचे संचालक प्रा. डॉ. भीमराया मेत्री यांनी केले.
अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात हा समारंभ पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाचा वार्षिक प्रगती अहवाल सादर करत विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला.या सोहळ्यात विविध विद्याशाखांतील ९६० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदव्या, तर १५ संशोधकांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला.
समारंभास सन्माननीय अतिथी म्हणून गोवा सरकारच्या राज्य उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. गोपाळ मुगेराया उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी भूषविले. डॉ. मुगेराया यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग समाजातील विविध घटकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि लोककल्याणासाठी करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात संजय घोडावत यांनी पदवीधरांचे अभिनंदन करून ते म्हणाले, यशाची शिखरे गाठताना उत्तम चारित्र्य, सचोटी आणि सामाजिक भान जपणे हे शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे.
समारंभात इंजिनिअरिंग, फार्मसी, डिझाईन, मीडिया, फिजिकल अँड केमिकल सायन्सेस, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, आर्ट्स, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी तसेच मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
या वेळी विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. एस. एम. इंगळे यांच्यासह सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, पदवीधर विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










