Edition

शहापुरात पोलिसांचा छापा; प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त! किराणा दुकानातून १ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

इचलकरंजी / प्रतिनिधी :महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी दत्तनगर परिसरातील किराणा दुकानावर छापा टाकून तब्बल १ लाख ६४ हजार ९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहापूर येथील दत्तनगर, गल्ली क्रमांक ८ मधील ‘सतीश किराणा स्टोअर्स’ येथे ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी संतोष शिवाजी गावकर (वय ३५, रा. दत्तनगर, शहापूर) याच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २७२, २७४, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाप्यामध्ये बिग्गी स्टार, विमल, मुसाफिर, केएस सुपर साऊंड, आरएन, आर-१, डायरेक्टर स्पेशल, रजनीगंधा यांसह विविध कंपन्यांच्या पानमसाल्याचे तसेच विविध ब्रँडच्या सुगंधित तंबाखू, जर्दा आणि च्युइंग टोबॅकोचे पाकिटे जप्त करण्यात आली. या मालाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. याशिवाय एक लाख रुपये किमतीची आयक्यूब इलेक्ट्रिक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. असा एकूण १ लाख ६४ हजार ९१ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे, पोलीस कर्मचारी उदय पाटील, सतीशकुमार गायकवाड, रोहित डावाळे आणि सहायक फौजदार बबन माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुटे करीत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!