
गांधीनगर:प्रतिनिधी-उदय साळुंखे
चिंचवाड (ता. करवीर) येथील ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम व ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजनेची कामे अत्यंत वेगाने सुरू आहेत. गावातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हेच ग्रामपंचायतीचे मुख्य ध्येय आहे. या कामादरम्यान कोणत्याही व्यक्तीला किंवा नागरिकाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा पदाधिकाऱ्यांचा अथवा प्रशासनाचा अजिबात हेतू नाही. सुरू असलेले पाईपलाईनचे काम हे पूर्णपणे सरकारी रस्त्याच्या हद्दीतूनच नियमानुसार केले जात आहे. त्यामुळे काही स्वार्थी घटकांनी ग्रामपंचायत प्रशासनाची निष्कारण बदनामी करू नये, असे स्पष्ट आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
शुद्ध पिण्याचे पाणी अन् सर्वांगीण विकास हेच ध्येय
गावाचा कायापालट करण्यासाठी आणि ग्रामस्थांना मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि सर्व पदाधिकारी रात्रंदिवस प्रयत्नशील आहेत. जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेले काम हे गावाच्या भविष्यातील पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे काम तांत्रिक बाबी तपासून आणि सरकारी नियमांचे तंतोतंत पालन करूनच केले जात आहे.
अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
शासकीय आणि सार्वजनिक हिताच्या कामांमध्ये काही घटकांकडून विनाकारण अडथळे निर्माण केले जात असल्याचे दिसून येत आहे. यावर भाष्य करताना ग्रामपंचायत प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, गावाच्या विकासात किंवा शासकीय कामात कोणीही जाणूनबुजून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास, संबंधित व्यक्तींवर प्रशासकीय नियमानुसार व कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल.
“आम्ही चिंचवाड गावच्या विकासासाठी आणि ग्रामस्थांना उत्तम सुविधा देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत. विकासकामे करताना सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे वैयक्तिक हेतूने किंवा आकसापोटी विकासकामांना अडथळा न आणता, सर्वांनी गावच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. सौ. श्रद्धा पोद्दार (सरपंच, चिंचवाड)










