सागाव, ता. शिराळा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी ऊसतोड बंदीच्या आवाहनाला सागावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ऊसाला प्रतिटन ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड सुरू करायची नाही, असा ठाम निर्धार सागावमधील सुमारे २०० शेतकऱ्यांनी केला. सरपंच सौ. अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. १५) झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यामुळे सागाव परिसरात ऊसदराच्या आंदोलनाची धग वाढण्याची चिन्हे आहेत.
सागाव येथे झालेल्या या समन्वय बैठकीला ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर, बैलगाडीवान, ट्रॅक्टरमालक आणि साखर कारखाना कामगारांचे प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर आले होते. ऊसदराच्या प्रश्नावर सर्व घटकांनी एकजूट दाखवत शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवलिंग शेटे, शिराळ्याचे राम पाटील आणि बिळाशीचे देवेंद्र धस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. साखरेचे दर वाढलेले असताना रिकव्हरी आणि वजनाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याची भूमिका त्यांनी मांडली. ऊसाला प्रतिटन ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता जाहीर होईपर्यंत ऊसतोड स्वीकारू नका, असे आवाहन त्यांनी केले. खासदार राजू शेट्टी कारखानदारांशी चर्चेच्या फेऱ्या घेत असून, ऊसदराची कोंडी फुटेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
ज्येष्ठ शेतकरी शशिकांत आप्पा पाटील आणि संजय संकपाळ यांनी ऊसशेतीचे अर्थकारण मांडताना वाढत्या उत्पादन खर्चाकडे लक्ष वेधले. मजुरी दुप्पट झाली, खतांचे दर वाढले; मात्र उसाला मिळणारा दर खर्चाच्या तुलनेत अपुरा असल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिटन ३,००० ते ३,५०० रुपये मिळून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित जुळत नसल्याने योग्य दर मिळेपर्यंत थांबणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या आंदोलनाला ऊसतोड कामगार आणि ट्रॅक्टरमालकांनीही पाठिंबा दर्शविला. आनंदा संकपाळ आणि दिलीप पाटील यांनी, “शेतकरी जगला तरच आम्ही जगू. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असेल, तर आम्ही त्याचे पालन करू,” अशी भूमिका मांडली. त्यामुळे ऊसदराच्या लढ्याला शेतकऱ्यांसह संबंधित घटकांचीही साथ मिळत असल्याचे स्पष्ट झाले.
अॅड. रवि पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर ऊसतोड थांबविण्याबाबत हात वर करून मतदान घेतले. ऊसतोड किती तारखेपर्यंत बंद ठेवायची, यावर चर्चा झाल्यानंतर उपस्थितांनी एकमुखाने २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऊसतोड स्वीकारायची नाही आणि ऊस तोडायचाही नाही, असा निर्धार व्यक्त केला. ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या बैठकीला चंद्रकांत पाटील, शंकर घोलप, संपत पाटील, अरुण पाटील, रघुनाथ पवार, जयंत शेटे यांच्यासह अनेक ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
सागावमधील या एकजुटीमुळे आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसदराचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, साडेचार हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्याच्या मागणीवर शेतकरी ठाम राहणार असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.









