ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल साडेपाच हजार रुपये मिळालीच पाहिजे, आणि ऊसदराच्या प्रश्नावर साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची भूमिका गांभीर्याने घ्यावी, असा थेट इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सांगली व सातारा जिल्ह्यांतील सुरू झालेल्या साखर कारखान्यांचे वजनकाटे बंद पाडण्यासाठी गुरुवारी (दि. १५) आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी दिली.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना, शिवनगर येथील क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना आणि कुंडल येथील पतंगरावजी कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना या तीन कारखान्यांवर आंदोलन होणार आहे. या आंदोलनात ऊस उत्पादक शेतकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी हेही कार्यकर्त्यांसह आंदोलनात उतरणार आहेत.
कर्नाटकातील कंगनोळी येथे सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले असून, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आता सांगली व सातारा जिल्ह्यांतील सुरू झालेले साखर कारखाने बंद पाडण्यासाठी आंदोलनाची दिशा निश्चित केली आहे. त्यानुसार ऊस उत्पादक शेतकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार आहेत.
ऊसदराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही, तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यक्त केला आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या आंदोलनाकडे सांगली व सातारा जिल्ह्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.










