Edition

गोकुळ निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्षपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, ३५ मतदान केंद्रांवर ५ हजार ४१८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क; १९ ऑक्टोबरला मतमोजणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर, दि. १३ (जिमाका) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६-२०३१ ची प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमानुसार पार पाडावी. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहणार नाही, तसेच कोणावरही आरोप होणार नाहीत, याची प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. गोकुळची निवडणूक महत्त्वाची असल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क राहून जबाबदारीने काम करावे, तसेच मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि कडेकोट बंदोबस्तात पार पाडावी, असे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.

गोकुळ निवडणुकीच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३५ मतदान केंद्रांवर एकूण ५ हजार ४१८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी ५० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदान १८ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून, मतमोजणी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून शासकीय बहुउद्देशीय हॉल, रमण मळा, कसबा बावडा, कोल्हापूर येथे होणार आहे.

निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघातून २० सदस्य निवडून द्यावयाचे असून, त्यासाठी ४० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी चार उमेदवार, इतर मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार, विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार, तर अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत. या निवडणुकीसाठी पाच स्वतंत्र मतपत्रिका वापरण्यात येणार असून, सर्वसाधारण मतदारसंघासाठी पांढरा, महिला प्रतिनिधींसाठी गुलाबी, इतर मागास प्रवर्गासाठी फिकट हिरवा, विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्गासाठी फिकट पिवळा आणि अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधींसाठी फिकट निळ्या रंगाची मतपत्रिका निश्चित करण्यात आली आहे. पाच मतपत्रिकांमुळे मतदान प्रक्रिया काळजीपूर्वक व नियमांनुसार पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
पोलीस अधीक्षक निलोत्पल म्हणाले, गोकुळ दुध संघाची निवडणूक जिल्ह्यासाठी संवेदनशील असून यामध्ये कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यस्थेला बाधा येणार नाही याप्रमाणे नियोजन केले असून संबंधित नियुक्त अधिकाऱ्यांनी अलर्ट मोडवर काम करावे. मतदान केंद्रामध्ये नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचारी व मत देण्यासाठी येणारा मतदार याशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येवू नये. मतदारांची ओळख पटवण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात यावी.

तालुकानिहाय मतदान केंद्रे व मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे : आजरा दोन केंद्रे व ३०५ मतदार, करवीर पाच केंद्रे व ८६५ मतदार, कागल चार केंद्रे व ६१९ मतदार, गगनबावडा एक केंद्र व १३१ मतदार, गडहिंग्लज तीन केंद्रे व ३९९ मतदार, चंदगड तीन केंद्रे व ४२३ मतदार, पन्हाळा तीन केंद्रे व ५१३ मतदार, भुदरगड चार केंद्रे व ५९३ मतदार, राधानगरी चार केंद्रे व ६९९ मतदार, शाहुवाडी तीन केंद्रे व ४४० मतदार, शिरोळ दोन केंद्रे व २७० मतदार आणि हातकणंगले एक केंद्र व १६१ मतदार. मतदान केंद्र क्रमांक २९ राधानगरी येथे सर्वाधिक १८२ मतदार, तर मतदान केंद्र क्रमांक ३४ शिरोळ येथे सर्वांत कमी १२९ मतदार आहेत.

मतदान प्रक्रियेसाठी ३५ केंद्राध्यक्ष, २१० मतदान अधिकारी आणि ३५ शिपाई नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय एक राखीव केंद्राध्यक्ष, ३० राखीव मतदान अधिकारी आणि पाच राखीव शिपायांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक याप्रमाणे ३५ शस्त्रधारी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. मतदारांची ओळख निश्चित करण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करावी, मतदान केंद्रांवर सतर्क राहावे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, असे निर्देश देण्यात आले. निवडणुकीदरम्यान कोणतीही तक्रार किंवा आक्षेप प्राप्त झाल्यास त्यावर नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

मतदान प्रक्रियेसाठी एकूण ३६ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये मतदान केंद्रांसाठी १२, क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी १२ आणि पोलीस बंदोबस्तासाठी १२ वाहनांचा समावेश आहे. यासाठी १० टेंपो व २६ तवेरा वाहने वापरण्यात येणार असून, दोन बस संघाकडून पुरविण्यात येणार आहेत. मतदान साहित्याचे वाटप व जमा करण्याची व्यवस्था शासकीय बहुउद्देशीय हॉल, रमण मळा, कसबा बावडा येथे करण्यात आली आहे. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सात टेबलांवरून मतदान साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

मतमोजणीसाठी ३२ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ३२ मतमोजणी पर्यवेक्षक, ६४ मतमोजणी सहाय्यक आणि पाच शिपाई नियुक्त करण्यात आले असून, दोन राखीव पर्यवेक्षक, चार राखीव सहाय्यक आणि तीन राखीव शिपायांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवरील मतपत्रिका मतदारसंघनिहाय एकत्रित करून प्रत्येकी २५ मतपत्रिकांचे स्वतंत्र गठ्ठे तयार करण्यात येणार आहेत. सर्वसाधारण मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक १ ते २२ वर, महिला प्रतिनिधींची २३ ते २६ वर, इतर मागास प्रवर्गाची २७ व २८ वर, विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्गाची २९ व ३० वर, तर अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधींची मतमोजणी ३१ व ३२ क्रमांकाच्या टेबलांवर होणार आहे.

निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांच्या ९ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजल्यापासून १८ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मतदान केंद्रांच्या ठिकाणी, तसेच १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केंद्रावर लागू राहणार आहेत.

बैठकीस पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी युसुफ शेख व प्रेमदास राठोड यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

एसआयआर अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 99.94 काम पूर्ण बिनचूक मतदान पद्धतीबाबत मतदार जनजागृती करा – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले – एसआयआर कामकाज, पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा घेतला आढावा

traffic tail

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

error: Content is protected !!