ईश्वरपूर प्रतिनिधी –
ऊरुण ईश्वरपूर शहरात बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर तत्काळ काढून पूर्वीप्रमाणे मीटर बसवावेत, ग्राहकांवर जोरजबरीने मीटर लादणे थांबवावे, अन्यथा रास्ता रोको आणि जेल भरो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्मार्ट मीटर हटाव कृती समितीचे सांगली जिल्हा निमंत्रक तथा माजी नगरसेवक शकील सय्यद यांनी महावितरण कंपनीला दिला.
समस्त ऊरुण ईश्वरपूर वीज ग्राहक आणि स्मार्ट मीटर हटाव कृती समितीच्या वतीने सय्यद यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे उपअभियंता जे. वाय. कुंभार यांना जाहीर निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते. स्मार्ट मीटर तत्काळ काढून पूर्वीचे मीटर बसवावेत, अशी मागणी ग्राहकांनी केली.
यावेळी शकील सय्यद म्हणाले, “कुंभार साहेब, आमच्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा. स्मार्ट मीटर तत्काळ काढून पूर्वीप्रमाणे मीटर बसवावेत. अन्यथा जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. हा क्रांतिसिंहांचा तालुका आहे. आमच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न करू नका. आमच्या मागण्या रास्त असून त्या तातडीने पूर्ण कराव्यात.”
यावर उपअभियंता जे. वाय. कुंभार यांनी ग्राहकांच्या भावनांचा आदर केला जाईल, असे सांगत यापुढे प्रत्यक्ष मीटर रीडिंग वेळच्या वेळी घेतले जाईल आणि कोणावरही अन्याय होणार नाही, असे स्पष्ट केले. याबाबत लेखी आश्वासन देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. मात्र, स्मार्ट मीटर बसविण्याबाबत केंद्र व राज्य सरकारच्या सूचना असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर सय्यद यांनी महावितरणच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ग्राहकांच्या घरात जाऊन त्यांच्या संमतीशिवाय मीटर बदलणे लोकशाहीला साजेसे नाही. स्मार्ट मीटरमुळे अनेक ग्राहकांना पूर्वीपेक्षा अवाजवी वीजबिले येत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्यक्ष रीडिंग न घेता देण्यात येणारी बिले ग्राहकांनी का भरावीत, असा सवाल त्यांनी केला.
“पूर्वीच्या मीटरमध्ये कोणताही दोष नसताना ते बदलण्याची गरज काय? स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी कसे फायदेशीर आहेत, यापेक्षा ग्राहकांवर त्याचा आर्थिक भार किती पडणार आहे, हे महत्त्वाचे आहे. ग्राहकांच्या हिताचा विचार करून महावितरणने आपला निर्णय बदलावा,” अशी मागणी सय्यद यांनी केली.
स्मार्ट मीटरचा निर्णय मागे घेऊन बसविण्यात आलेले मीटर तत्काळ काढावेत, जोरजबरदस्ती थांबवावी आणि वीज ग्राहकांना पूर्वीप्रमाणे सेवा द्यावी. अन्यथा कोणत्याही क्षणी पेठ सांगली येथे रास्ता रोको आणि जेल भरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सय्यद यांनी दिला.
यावेळी जमीर नालबंद, तात्यासाहेब बामणे, आरुण कुपाडे, महमंद वायकर, रामराव थोरात, इकबाल वायकर, मुस्ताक मोमीन, शकील पटवेकर, लतीफ जमादार, राहमतुल्ला पटवेकर, शब्बीर जमादार, प्रकाश टिबे, प्रशांत रास्कर, अर्जुन रास्कर, अमित पाटोळे, जयवंत टिबे, प्रकार पाटोळे, राजेंद्र साळुंखे, दत्तात्रय साळुंखे, रविंद्र विरकर, फारुक मोमीन यांच्यासह मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते.











