Edition

श्रीराम प्रतिष्ठान येथे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात साजरा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : शिक्षक दिनाच्या पवित्र व प्रेरणादायी प्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार व विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. भरतकुमार लाड व श्री. गिरी सर उपस्थित होते. तसेच संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य अशोक बोडखे, कैलास ताठे, सौ. शालिनी शेळके, डॉ. मीनाक्षी रत्नपारखी, सुबोध हिवराळे, अनिल कुमार, अब्दुल बाशा, डॉ. बबन सोनवणे, हरिभाऊ कांबळे, राजेंद्र जाधव, डॉ. महेश कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. संजय रोडगे म्हणाले की, “आजचा शिक्षक केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारा, त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून ते विकसित करणारा आणि भविष्यासाठी सक्षम करणारा मार्गदर्शक असला पाहिजे.”आजचे युग विज्ञान, तंत्रज्ञान आणि माहितीचे युग आहे. त्यामुळे शिक्षकांनी केवळ पारंपरिक अध्यापन पद्धतीवर अवलंबून न राहता स्वतःला सातत्याने अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. Artificial Intelligence, डिजिटल तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम, इंटरनेट, आधुनिक शिक्षण साधने आणि बदलत्या शैक्षणिक पद्धती यांचे ज्ञान शिक्षकांनी आत्मसात केले पाहिजे. विद्यार्थ्यांना शिकविण्यापूर्वी शिक्षकाने स्वतः सतत शिकत राहणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.पुढे बोलताना डॉ. रोडगे म्हणाले, “विद्यार्थ्यांकडे आज माहितीचा अभाव नाही; माहिती त्यांच्या मोबाईलवर एका क्षणात उपलब्ध होते. मात्र त्या माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे शहाणपणात रूपांतर करण्याचे काम शिक्षकाने करायचे आहे.” त्यामुळे बदलत्या काळात शिक्षकाची भूमिका अधिक व्यापक आणि महत्त्वपूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.प्रमुख पाहुणे श्री. भरतकुमार लाड यांनी आपल्या मनोगतात आजच्या शिक्षकामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन असणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धा, अफवा किंवा चुकीच्या समजुती वाढविण्याऐवजी प्रश्न विचारण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची, प्रयोग करण्याची आणि पुराव्याच्या आधारे निष्कर्ष काढण्याची वृत्ती शिक्षकाने निर्माण केली पाहिजे. ‘का?’ आणि ‘कसे?’ हे प्रश्न विचारण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हीच खरी वैज्ञानिक शिक्षणाची सुरुवात आहे.” शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, चिकित्सक विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
आदर्श शिक्षक पुरस्कार- रेखा नांगरे, बाजीराव मोगल, वैभव शिकारे, गौतम इंगोले, विजय मैफल, कालींदा पवार, राजश्री वानरे, धुमाळ सर, भगवान शीरसागर, भागवत थोरात. बेस्ट ॲक्टिव्हिटी टीचर पुरस्कार- अंजली कलुंदिया, रविशंकर, विनायक थिटे, सारिका ताठे, भागवत घुगे, ढाले मॅडम, विजय धापसे. इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्कार- मानसी यादव, मोहम्मद शोएब. एक्सलन्स इन क्लासरूम मॅनेजमेंट पुरस्कार- स्वाती कदम, जया माधुरी. स्टुडंट मेंटर पुरस्कार – रीना ठाकूर, मिताली ढाले. विषयतज्ज्ञ पुरस्कार- आकाश ठाकर, अमोल भुजबळ, महादेव खोसे, साधना मस्के, आदित्य पवार. लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-मीरा मिरिंडा. यंग टीचर अवॉर्ड-कुसुम ताठे, हनुमान मस्के, अनिता पवार.बेस्ट डेब्यू टीचर अवॉर्ड- संगीता शेटी, सायली कोकड, मनिषा थिटे. सपोर्टिव्ह स्टाफ पुरस्कार -उमान शेख, बालाजी बामणे, काशिनाथ सोळंके, गणेश सोनार. बेस्ट टेक्नोसेव्ही पुरस्कार-राजेंद्र देशमुख. रिसर्च अँड पब्लिकेशन पुरस्कार -डॉ. महेश कोल्हे.
पुरस्कार प्राप्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या योगदानाला प्रोत्साहन देणे, तसेच गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि विज्ञानवादी शिक्षणासाठी शिक्षकांना प्रेरणा देणे हा या पुरस्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिगंबर टाके व सौ.कल्पना भाबट यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.संदीप आकात यांनी मानले.कार्यक्रमास श्रीराम प्रतिष्ठानमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!