कोल्हापूर (प्रतिनिधी) : सक्षम भारतीय नागरिक घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात ज्ञानदान करत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून सामाजिक भान जपत भरीव योगदान देऊन शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने ठसा उमटविणारे पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर, ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत प्राचार्य डॉ. हरीश भालेराव यांना यावर्षीचा मानाचा, सन्मानाचा व स्वाभिमानाचा इंडियन टीचर्स फोरम तर्फे देण्यात येणारा नॅशनल आयडियल टीचर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रविवार, 6 सप्टेंबर, 2026 रोजी दुपारी 12:30 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत इंडियन टीचर्स फोरमचे प्रमुख व ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. डी. श्रीकांत यांनी दिली.
उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रातील योगदानाची दखल या पुरस्कारासाठी आमदार प्रा. जयंत आसगावकर, डॉ. हरीश भालेराव यांची निवड करण्यात आली असल्याचे मोहन मिणचेकर यांनी सांगितले.
डॉ. डी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या पुरस्कार वितरण कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील, प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने, लेखक व विचारवंत डॉ. श्रीपाद देसाई, लेखिका डॉ. शोभा चाळके, ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर आणि इंडियन टीचर्स फोरमचे मोहन मिणचेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रा. विक्रम कदम, शिकंदर बेलोशे, चंद्रकांत कासार, स्वाती लोखंडे, दशरथ जाधव, सतिश घुगरे, मनिषा गावडे, डॉ. रेखा गोरे, मयुरी जंत्रे, रवींद्र सूर्यवंशी यांना नॅशनल आयडियल टीचर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा घटक नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणारा आणि समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक आहे. अशा शिक्षकांच्या कार्याचा सन्मान केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण होण्यास मदत होते.
अंतिमा कोल्हापूरकर आणि गंगाधर म्हमाने कार्यक्रमाचे समन्वयक आहेत तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित मसुर्लीकर आणि अर्हंत मिणचेकर करणार आहेत.
शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, शिक्षणप्रेमी, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी या पुरस्कार वितरण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन इंडियन टीचर्स फोरमतर्फे अंतिमा कोल्हापूरकर यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला डॉ. डी. श्रीकांत, सुरेश केसरकर, विश्वासराव तरटे, अंतिमा कोल्हापूरकर, गंगाधर म्हमाने, अभिजित मसुर्लीकर, अर्हंत मिणचेकर उपस्थित होते.











