
मांगले येथील पत्नीच्या खूनप्रकरणी आरोपी मंगेश चंद्रकांत कांबळे यास न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे
शिराळा पोलीस ठाणे हद्दीतील मांगले येथे पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी पती मंगेश चंद्रकांत कांबळे यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड ठोठावला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मार्च २०२५ रोजी आरोपी मंगेश कांबळे याने पत्नी प्राजक्ता मंगेश कांबळे हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत तिच्या गळ्यावर ओढणी आवळून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवून पेटीचे दोन्ही दरवाजे बंद केले. तसेच पेटीला कुलूप लावून तो घटनास्थळावरून निघून गेला.
या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आरोपीचा मुलगा शिवम मंगेश कांबळे असल्याची माहिती पोलिसांकडून नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. देविदास एच. केळुसकर, इस्लामपूर यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपी मंगेश कांबळे यास दोषी धरून कलम १०३(१) व २३८ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड सुनावला.
सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. सतीश विश्वास केकणिस यांनी बाजू मांडली. खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यामध्ये मयताची आई रंजना अर्जुन चांदणे, आरोपीचा मुलगा शिवम कांबळे, पंच, वैद्यकीय अधिकारी तसेच तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
सरकार पक्षाने आरोपी हा मयताचा पती असून पत्नीच्या आयुष्याची जबाबदारी पती म्हणून पार पाडण्याऐवजी पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिचा खून केल्याचा ठोस युक्तिवाद न्यायालयासमोर केला.
या खटल्याच्या कामकाजात सहाय्यक पोलीस निरीक्षक मुद्दसर शेख, सांगली कोर्ट पैरवी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल उत्तम शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सौ. सुंदना सुरेश निकम आणि इतर स्टाफने मोलाचे सहकार्य केले.











