गांधीनगर/प्रतिनिधी:
उदय साळुंखे, गांधीनगर येथील फेडरल बँकेच्या चिंचवाड एक्स्टेंशन शाखेत बनावट सोने तारण कर्ज मंजूर करून २२ लाख ९९ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बँकेचे ब्रांच ऑपरेशन्स इनचार्ज आयुष किशोर राऊत (रा. गोधनी रोड, मानकापूर, नागपूर) याच्याविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑडिटमध्ये प्रकार उघडकीस
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आयुष राऊत हा ०८ मे २०२६ पासून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कामावर गैरहजर राहिला होता. त्यानंतर बँकेच्या शाखेत झालेल्या अंतर्गत ऑडिट दरम्यान आरोपीने आपल्या पदाचा आणि संगणक प्रणालीच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचे उघड झाले. बँकेत प्रत्यक्षात कोणतेही सोन्याचे दागिने जमा नसताना, संगणक प्रणालीमध्ये बनावट व खोट्या नोंदी करून दागिने कस्टडीत असल्याचे दाखवले गेले.
ग्राहकाच्या नावे बनावट कर्ज
आरोपीने ग्राहक विकास अशोक पाटील यांच्या नावे बनावट सोने तारण कर्ज मंजूर केले. त्यानंतर ही मंजूर झालेली २२,९९,५०० रुपयांची रक्कम आरोपीने बेकायदेशीरपणे स्वतःच्या व इतर खात्यांवर वर्ग करून बँकेचा अपहार केला आणि तेथून पसार झाला.
पोलीस तपास सुरू
बँकेच्या सिनियर मॅनेजर आणि शाखा प्रमुख सौ. नुपूर संदीप जाधव यांच्या तक्रारीवरून गांधीनगर पोलीस ठाण्यात BNS ३१६(४), ३१८(४), ३३६(३), ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी आयुष राऊत याच्याविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार (क्र. ३३/२०२६) नोंदवण्यात आली असून तो सध्या फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करत आहेत.











