
शिराळा प्रतिनिधी : शेडगेवाडी (ता. शिराळा)
येथे गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा लोकवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः दोन दिवसांपूर्वी माध्यमिक शाळेच्या परिसरात भरदिवसा बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांसह पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून ग्रामस्थांना सुरक्षितता मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बिबट्याच्या वाढत्या वावराची गंभीर दखल घेत वन विभागाच्या पथकाकडून गेल्या दोन दिवसांपासून ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विविध ठिकाणी पाहणी केली जात असून, त्याला पकडण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पिंजरा व सापळा लावण्यात आला आहे. मात्र बिबट्याचा वावर लोकवस्तीच्या परिसरात सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता कायम आहे.
दरम्यान, आमदार सत्यजित देशमुख यांनी शेडगेवाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ तसेच गावातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून बिबट्याच्या वावराबाबत सविस्तर माहिती घेतली.
बिबट्याच्या हालचाली कोणत्या भागात अधिक आहेत, याचीही त्यांनी माहिती जाणून घेतली.
शेडगेवाडीचे सरपंच तानाजी नाटूलकर यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आमदार देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांनी नाटूलकर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून घटनेची माहिती घेतली. लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढणे ही गंभीर बाब असून, कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वन विभागाची रेस्क्यू टीम तातडीने शेडगेवाडीत बोलावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे आदेश आमदार सत्यजित देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, पिंजरे व इतर साधने उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.
शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
बिबट्या शाळेच्या परिसरात भरदिवसा आढळून आल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि शेतकरी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांनी सायंकाळच्या वेळी शेताकडे जाणे टाळावे, तसेच ग्रामस्थांनी एकट्याने बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
बिबट्याचा शोध घेण्यासाठी ड्रोनद्वारे सुरू असलेली मोहीम अधिक प्रभावी करण्याबरोबरच, त्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवावे. बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करून ग्रामस्थांवरील भीतीचे सावट दूर करावे, अशी अपेक्षा शेडगेवाडी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग ॲलर्ट मोडवर आला असून लवकरच बिबट्याला जेरबंद केले जाईल असे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.











