Edition

नागपंचमीच्या पावित्र्याचे रक्षण करून परंपरेला पुन्हा वैभव मिळवूया : रणधीर नाईक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा, प्रतिनिधी :
शिराळा येथील ऐतिहासिक व जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सवाला यंदा घडलेल्या काही अनुचित प्रकारांमुळे गालबोट लागले असून, या घटनांमुळे शिराळकरांची मान शरमेने खाली गेली आहे. नागपंचमीची परंपरा, तिचे पावित्र्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आता सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी शिराळा येथील जनसेवा शिवाजीराव नाईक संपर्क कार्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदे मध्ये केले.
रणधीर नाईक पुढे म्हणाले की, शिराळ्याच्या नागपंचमीचा लौकिक पूर्वजांनी संपूर्ण देशभर पोहोचविला. मात्र यंदाच्या उत्सवातील काही घटनांमुळे सोशल मीडिया तसेच विविध वृत्तवाहिन्यांवर शिराळ्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. त्यामुळे जगभरात विखुरलेल्या शिराळकरांनाही उपरोधिक टीकेला सामोरे जावे लागत आहे. पारंपरिक पद्धतीने आणि सांस्कृतिक मूल्यांचे भान राखून उत्सव साजरा करणारे नागरिक मात्र दुर्लक्षित राहिले, अशी खंत नाईक यांनी व्यक्त केली.
उत्सवातील काही ठिकाणी झालेल्या अशोभनीय प्रकारांवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेषतः अल्पवयीन मुलांच्या उपस्थितीत घडलेल्या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, अंबामातेच्या जयघोषाने सुरू होणाऱ्या या पवित्र उत्सवाचे धार्मिक व सांस्कृतिक स्वरूप अबाधित राहिले पाहिजे. यासाठी नागपंचमी दिवशी झालेला विभस्त   प्रकार रोखण्यासाठी लवकरात लवकर नगरपंचायतींने ग्रामसभा बोलवावी असे नाईक यांनी नमूद केले.
“जे घडले ते संतापजनक आहे; मात्र आता दोषारोप करण्याची वेळ नसून सुधारणा करण्याची वेळ आहे,” असे स्पष्ट करत रणधीर नाईक यांनी या परिस्थितीची नैतिक जबाबदारी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेतृत्वावरही असल्याचे मान्य केले. तरुणाईला योग्य दिशा देणे, उत्सवाचे नियोजन संस्कृती व परंपरेला धरून करणे आणि गैरप्रकारांना वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
रणधीर नाईक पुढे म्हणाले,यापुढे अशा घटना शिराळ्यात घडू नयेत, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. चूक करणारे तरुण आपल्या समाजातीलच आहेत. त्यांना चूक लक्षात आली असून पश्चात्ताप असेल आणि भविष्यात अशी पुनरावृत्ती होणार नसेल, तर त्यांना अवमानित न करता मोठ्या मनाने सोबत घेऊन परिवर्तन घडवून आणले पाहिजे. मात्र जाणीवपूर्वक गैरप्रकार सुरूच राहिले, तर कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असेही रणधीर नाईक यांनी स्पष्ट केले.
“आपल्या माता, भगिनी आणि मुलींना आपण कोणते सामाजिक वातावरण वारशाने देत आहोत, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे,” असे सांगत नाईक यांनी समाजातील सर्व घटकांना आत्मपरीक्षणाचे आवाहन करत शिराळ्याची नागपंचमी ही केवळ उत्सवाची परंपरा नसून ती धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेचा वारसा आहे. हा वैभवशाली वारसा पुढील पिढ्यांपर्यंत सन्मानाने पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. “सर्व शिराळकरांनी मनात आणले तर अशक्य काहीच नाही. “पुनश्च हरिओम” करून बदलाची सुरुवात करूया आणि नागपंचमीची परंपरा पुन्हा वैभवाच्या शिखरावर नेऊया,” असे आवाहन रणधीर नाईक यांनी केले.
चौकट -: नागपंचमी दिवशी झालेला विभस्त प्रकार रोखण्यासाठी लवकरात लवकर नगरपंचायतींने  सर्व राजकीय मंडळी , नागराज मंडळे, महिला व ग्रामस्त एकत्रित ग्रामसभा बोलवावी असे रणधीर नाईक यांनी नमूद केले.

 

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!