
शिराळा : शिराळा तालुक्याच्या डोंगरमाथ्यावरील शेतीला सिंचनाचा आधार देणाऱ्या शिराळा उपसा सिंचन योजनेच्या (शिराळा एल.आय.एस.) प्रशासकीय मान्यतेचा अहवाल तातडीने सादर करावा, अशा सूचना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या योजनेस लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आमदार सत्यजित देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे महत्त्वपूर्ण बळ मिळाले आहे.
कोल्हापूर पाटबंधारे मंडळाच्या प्रकल्प कामांचा आढावा व पाहणी दौरा डॉ. हेमंत धुमाळ यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी आमदार सत्यजित देशमुख यांनी शिराळा तालुक्यातील सिंचन, पर्यटन व पायाभूत सुविधांबाबत विविध मागण्या मांडल्या.
शिराळा एल.आय.एस.साठी २.५ टीएमसी पाणी राखीव :
शिराळा उपसा सिंचन योजनेसाठी पाटबंधारे विभागाने २.५ टीएमसी पाणी राखीव ठेवले असल्याची महत्त्वपूर्ण माहिती डॉ. धुमाळ यांनी दिली. या योजनेमुळे गुढे, पाचगणी, मेणी-येळापूर, कोंडाईवाडी, धामवडे यासह डोंगरमाथ्यावरील मोठे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती देऊन ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, तसेच योजनेसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली.
वारणा धरणात बोटिंग; दोन बोटी तातडीने उपलब्ध करणार :
वारणा धरण परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी आधुनिक व अभिनव सुविधा निर्माण करण्याची गरज आमदार देशमुख यांनी व्यक्त केली. यावर डॉ. धुमाळ यांनी वारणा धरण परिसर नजीकच्या काळात अग्रगण्य पर्यटनस्थळ म्हणून विकसित केला जाईल, असे सांगत पर्यटकांसाठी बोटिंग सुविधा सुरू करण्यासाठी दोन बोटी तातडीने उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.
शिवसृष्टीसाठी शासनाकडून भरीव निधी
मत्स्य बीज केंद्र परिसरात प्रस्तावित भव्य शिवसृष्टीच्या जागेची पाहणी करून आराखड्याची माहिती घेण्यात आली. आमदार सत्यजित देशमुख यांनी येथे शिवसृष्टी उभारण्याचा घेतलेला संकल्प आदर्शवत असून, या ठिकाणी भव्य-दिव्य शिवसृष्टी उभारण्यासाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही डॉ. धुमाळ यांनी दिली.
वारणावती येथील विश्रामगृहाच्या सुरू असलेल्या दुरुस्ती कामाचीही पाहणी करण्यात आली. पर्यटक, अभ्यासक व अन्य अभ्यागतांना चांगल्या सुविधा मिळतील, अशा पद्धतीने विश्रामगृहाचे आधुनिकीकरण करण्याची मागणी आमदार देशमुख यांनी केली. मणदूर येथील जमिनीच्या प्रश्नावरही शासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.
यावेळी माजी सभापती हणमंतराव पाटील, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंते ज्योती देवकर, नितीश पोतदार,हिंदुराव नांगरे, सर्जेराव पाटील,ए. एन. मोरे, डी. एन. चव्हाण, उपअभियंते अक्षयकुमार खराडे, विजय आंबोळे, सतीश चव्हाण, एस. जे. पाटील, एस. एस. चव्हाण, आर. बी. पाटील, शाखा अभियंता विक्रम सावंत, केदार पवार आदी उपस्थित होते. दौऱ्यादरम्यान डॉ. हेमंत धुमाळ यांचा सत्कार करण्यात आला.










