गांधीनगर:प्रतिनिधी-उदय साळुंखे
गांधीनगर (तालुका करवीर):
गांधीनगर-चिंचवाड मुख्य रस्त्यावरील ट्रान्सपोर्ट लाईनच्या वाढत्या बेशिस्त वाहन पार्किंगमुळे व सततच्या वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या चिंचवाड येथील ग्रामस्थांनी आज ‘वळीवडे कॉर्नर’ येथे तीव्र धरणे आंदोलन छेडले. गांधीनगर-चिंचवाड रस्त्यावरून ट्रान्सपोर्ट लाईन तात्काळ स्थलांतरित करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी आक्रमक मागणी याप्रसंगी ग्रामस्थांनी केली.
नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात
गांधीनगर-चिंचवाड मार्गावरील ट्रान्सपोर्ट लाईनमुळे या रस्त्यावर दिवस-रात्र अवजड आणि लहान मालवाहतूक वाहनांची मोठी वर्दळ असते. चालक-मालकांकडून रस्त्यावरच गाड्या अस्ताव्यस्त उभ्या केल्या जात असल्याने या मार्गावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीमुळे चिंचवाड आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला असून स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनधारकांमध्ये रोजच्या रोज खटके उडत आहेत.
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी असोसिएशन सहकार्यास तयार
दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. वाहतुकीला योग्य शिस्त लावण्यासाठी आमची असोसिएशन स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांसोबत पूर्ण सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे,” असे त्यांनी सांगितले.
पोलीस प्रशासनाला निवेदन
आंदोलनानंतर चिंचवाडच्या सरपंच श्रद्धा पोतदार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. ट्रान्सपोर्ट लाईन लवकरात लवकर स्थलांतरित न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.








