डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे बँकांना निवेदन.
सात दिवसांत कारवाईचा अहवाल देण्याची मागणी; अन्यथा आरबीआयकडे तक्रार करणार.
सेलू : सेलू शहरातील बँक ऑफ बडोदा आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि इतर बँकांच्या शाखांमध्ये दुपारच्या जेवणाच्या वेळेत शटर बंद करून ग्राहक सेवा खंडित केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायत, तालुका शाखा सेलूच्या वतीने संबंधित बँकांना निवेदन देण्यात आले आहे. बँकांच्या या कार्यपद्धतीमुळे ग्राहकांची गैरसोय होत असून, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ग्राहक सेवा नियमांचे पालन करण्याची मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे.ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत ग्राहक पंचायतीने संबंधित बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना निवेदन सादर केले. बँकांच्या कामकाजाच्या वेळेत ग्राहकांना अखंडित सेवा मिळणे आवश्यक असून, जेवणाच्या सुट्टीच्या नावाखाली संपूर्ण काउंटर बंद ठेवणे किंवा शाखेचे शटर बंद करून ग्राहकांना प्रतीक्षा करायला लावणे योग्य नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आरबीआयच्या नियमांचे पालन करण्याची मागणी
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने आपल्या निवेदनात RBI Master Circular on Customer Service, 2014 मधील संबंधित तरतुदींचा संदर्भ दिला आहे. बँकेच्या कामकाजाच्या वेळेत कर्मचारी उपलब्ध असावेत, कोणतेही काउंटर विनाकारण रिकामे राहू नये आणि ग्राहक सेवा खंडित होऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांनी रोटेशन पद्धतीने जेवणाची सुट्टी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.ग्राहकांना वेळेत बँकिंग सेवा मिळणे हा महत्त्वाचा विषय असून, दुपारच्या वेळेत बँकेचे शटर बंद ठेवून ग्राहकांना ताटकळत ठेवण्याच्या प्रकाराची संबंधित बँकांनी गांभीर्याने दखल घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
सात दिवसांत लेखी उत्तर देण्याची मागणी.
संबंधित बँकांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन ग्राहक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत सात दिवसांच्या आत लेखी माहिती द्यावी, अशी मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे. निर्धारित मुदतीत समाधानकारक कार्यवाही न झाल्यास भारतीय रिझर्व्ह बँकेच्या CMS पोर्टलवर (cms.rbi.org.in) तसेच संबंधित बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.ग्राहकांना बँकिंग सेवांसाठी अनावश्यक प्रतीक्षा करावी लागू नये आणि बँकांच्या कामकाजाच्या वेळेत सेवा अखंडितपणे उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ग्राहक पंचायत पुढाकार घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या निवेदनप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, सेलू तालुका अध्यक्ष सतीश जाधव, तालुका उपाध्यक्ष रवी कुलकर्णी, तालुका सचिव गंगाधर कान्हेकर, सहसचिव सुनील गायकवाड, पर्यावरण प्रमुख नागोराव देशमुख, तसेच के. जी. कुलकर्णी, रवी मुळावेकर यांच्यासह ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि बँकिंग सेवांमधील पारदर्शकता यासाठी संबंधित बँकांनी या निवेदनाची दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.










