Edition

राज्यात राजकीय उथापालथ अटळ; ‘रोहिणी’चा पाऊस धो-धो बरसणार! फरांडे बाबांची भाकणूक: महागाईने जनता त्रस्त होणार; तांब्याचे भाव वाढणार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर (प्रतिनिधी):-उदय साळुंखे

“मिलीची पेर ठरणार असून रोहिणीचा पाऊस धो-धो आणि जोरदार बरसणार आहे. राज्यात मोठी राजकीय उथापालथ होईल. रस-गुल (गुळ/रस) महागणार, तांबे उदंड विकले जाऊन त्याचे भाव गगनाला भिडतील, तर रोगराईचा प्रादुर्भाव वाढेल. कानाने ऐकाल ते डोळ्याने पाहणार नाही…” अशी महत्त्वपूर्ण आणि चिंताजनक भाकणूक तात्यादेव वाकुळे फरांडे बाबा यांनी केली.
करवीर तालुक्यातील वसगडे येथे आयोजित श्री विठ्ठल बिरदेव यात्रेच्या धार्मिक सोहळ्यात फरांडे बाबांनी ही भाकणूक केली. महागाई वाढून सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडतील आणि जनता त्रस्त होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अखंड जयघोषात यात्रेचा प्रारंभ
वसगडे (ता. करवीर) येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेला गुरुवारी दुपारी पारंपरिक भाकणुकीच्या धार्मिक सोहळ्याने उत्साहात प्रारंभ झाला. “श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं”च्या अखंड जयघोषात, धनगरी ढोल आणि कैताळाच्या निनादात तसेच भंडार्‍याच्या उधळणीत परिसर न्हाऊन निघाला होता. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविक दाखल झाले होते.
मानाच्या विटेवर पूजन अन् खंडेराव खेळ
तात्यादेव वाकुळे फरांडे बाबा हे अनवाणी पायी चालत वसगडे येथे आले. सकाळी मानस मंदिरात जोड तलवारीचे पूजन करून मानकरी पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यात्रा कमिटी सदस्य, पुजारी आणि सेवेकऱ्यांनी हत्यार-कांबळा घेऊन धनगरी ढोलाच्या तालावर फरांडे बाबांना मानाच्या गादीवर आणून बसवले.
गादीवरील मानाच्या विटेचे आणि बाबांचे पूजन करून त्यांना पूजन केलेली जोड तलवार सुपूर्द करण्यात आली व ‘खंडेराव खेळण्यासाठी’ आमंत्रित करण्यात आले. फरांडे बाबांनी मंदिरात प्रदक्षिणा घालून प्रवेश केला आणि भाकणूक केली. भाकणुकीनंतर फरांडे बाबांनी आपला २१ दिवसांचा उपवास मानकरी संजय पाटील यांच्या घरी सोडला. सायंकाळी श्रींची मानाची पहिली पालखी आणि दुसऱ्या गाडीची भंडारा उधळणीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
दुष्काळाचा यात्रेवर परिणाम; चोख पोलीस बंदोबस्त
यंदा मराठवाडा व विदर्भात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे यात्रेवर काहीसा परिणाम दिसून आला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची गर्दी थोडी कमी होती. तरीही यात्रेत विविध वस्तूंचे स्टॉल्स, हॉटेल्स आणि मिठाईची दुकाने थाटली होती.
यात्रेचे उत्कृष्ट नियोजन सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी, ग्रामसेवक, यात्रा कमिटी, धनगर समाज, मानकरी आणि ग्रामस्थांनी केले. आरोग्य खाते आणि महावितरण कंपनीने या दरम्यान उत्तम सेवा दिली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!