

शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी…
समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून “विद्यार्थ्यांशी संवाद” हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मायने व नूतन प्रशिक्षित पोलीस उपअधीक्षक यांनी दि.१८ रोजी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील श्री अनंतपाळ नूतन विद्यालय येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. नाव, फोटो आणि पदाचा बडेजाव न ठेवता केवळ “एक मित्र” म्हणून विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्यात आली.
संवादादरम्यान मायने यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाधीनता,सायबर गुन्हे,मोबाईलचा योग्य वापर, महिला सुरक्षा, वाहतूक नियम आणि स्पर्धा परीक्षांची तयारी यांसारख्या महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.
“पोलिसांना फक्त भीतीचे नाव म्हणून न पाहता ते तुमचे मित्र आहेत. कोणत्याही अडचणीत ११२ वर कॉल करा. अभ्यासाबरोबरच शिस्त, देशभक्ती आणि कायद्याचा आदर ठेवा” असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
विद्यार्थ्यांनी देखील पोलिसांच्या कामाविषयी, करिअरमधील संधी आणि विविध समस्यांबाबत प्रश्न विचारले. त्यांना पोलीस उपअधीक्षकांनी सविस्तर उत्तरे देऊन समुपदेशन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस दलाविषयी असलेली भीती दूर होऊन मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. शाळा प्रशासन आणि पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव संस्थेचे अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व इयत्ता ८ वी ते १२ वीचे सुमारे ५०० विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











