
इस्लामपूर दि. तंत्र-मंत्र, अघोरी विद्या, अंधश्रद्धा, जादूटोणा, करणी व भानामती या खोट्या संकल्पना असून चमत्कार करणारे बदमाश असतात, त्यावर विश्वास ठेवणारे मुर्ख असतात. आपली फसवणूक करून घेऊ नये असे प्रतिपादन अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी केले.
ते येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूरच्या
विवेक वाहिनी विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
यांच्या संयुक्त विद्यमाने
“बुवाबाजीचा भांडाफोड व चमत्काराचे सादरीकरण’या विषयावरील कार्यशाळेत बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर होते.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात महा अंनिसच्या प्रकाशन विभागाचे राज्य कार्यवाह, ज्येष्ठ कार्यकर्ते प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे, ठाणे यांनी वैज्ञानिक प्रयोगाचे सादरीकरण करताना विविध रासायनिक व हात चालाखीचे प्रयोगांचे सादरीकरण केले. हात चलाखी, माइंड रीडिंग, भौतिकशास्त्राची नियम, वैज्ञानिक करणे, अंकशास्त्र व गणिताचे नियम यांचा वापर करून भोंदूलोक अज्ञ व पीडित लोकांना फसवितात. तसेच कोणत्याही बुवाबाबाच्या चमत्काराला आहारी न जाता सजग राहून त्यास विरोध करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे सर यांनी नागपंचमी निमित्त सर्प विषयांच्या अंधश्रद्धा, समज गैरसमज या विषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले “सर्प म्हटलं की भीती आणि अंधश्रद्धा लोकांच्या मनात येतात. त्यामुळे साप दिसला की मारला जातो.साप हा पर्यावरणाचा प्रमुख घटक, त्याच्या विषाचे औषधामधील स्थान, अन्नसाखळीतील महत्त्व मोठे आहे.साप डूक धरत नाही.सर्पदंश झाल्यावर सर्पप्रतिबंधक इंजेक्शन घ्यावी लागते त्यावर मंत्र उपचार चालत नाही.”
कार्यशाळेच्या तृतीय सत्रात प्रा डॉ राम घुले म्हणाले, “चमत्कार करणारे,मंत्रतंत्र करणारे, ज्योतिषी, हस्तसामुद्रिक, अध्यात्मशास्त्री संख्याशास्त्री, गुढवादी व अध्यात्मिक बाबा ढोंगी लबाड असतात विद्यार्थ्यांनी त्यांचा ढोगींपणा वैज्ञानिक दृष्टिकोनातून उघड पाडावा त्यासाठी चमत्काराचे प्रयोग शिकावेत. आपल्या भागात कोण भोंदूगिरी करणारे असेल तर त्यांची माहिती अंनिसला द्यावी त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल.”
यावेळी कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. बेलवेटकर म्हणाले “ विद्यार्थिनींनी चमत्काराचे प्रयोग शिकून घेऊन आपल्या भागातील अंधश्रद्धा दूर कराव्यात. कोणत्याही अंधश्रद्धेला व चमत्काराला बळी पडू नये”
कार्यशाळेत चमत्काराच्या विविध प्रयोगांची प्रात्यक्षिके दाखवून प्रशिक्षणार्थींना भोंदू बाबा भक्तांना चमत्कार करून कसे फसवितात याचे हँड टू हॅन्ड प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाचा लाभ ५० विदयार्थ्यांनी घेतला. कार्यशाळेस सांगली जिल्हा प्रधान सचिव खंडू खोडे, डॉ. शीला रत्नाकर, ग्रंथपाल बी.डी. खामकर, प्रा. डॉ. रंजना पवार, प्रा. निलेश डामसे, प्रा. स्वाती चौधरी, अजय आयरेकर प्रा. शैलजा पाटील, प्रा उत्तरा पाटील, प्रा, सानप व इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.











