Edition

शिराळ्यात नागपंचमीचा उत्साह; ४१ जिवंत नागांच्या प्रदर्शनाला परवानगी, घरोघरी प्रतिकात्मक नागपूजा हजारो भाविकांची शिराळ्यात गर्दी; अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी मोठी रांग..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिवंत नागांच्या पूजेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे आज पारंपरिक उत्साहात नागपंचमी साजरी होत आहे. घरोघरी महिलांकडून प्रतिकात्मक नागाच्या प्रतिमेची विधिवत पूजा केली जात असून, शिराळ्यातील अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. नागपंचमीचा उत्सव पाहण्यासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातून हजारो भाविक शिराळ्यात दाखल झाले आहेत.
दरम्यान, केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाने काही अटी व शर्तींवर ४१ ग्रामस्थ व मंडळांना नाग पकडण्याची आणि नागांचे प्रदर्शन करण्याची परवानगी दिली आहे. निसर्गचक्रात नागांचे असलेले महत्त्व नागरिकांना समजावे तसेच सर्पसंवर्धनाबाबत पारंपरिक ज्ञानाचा प्रसार व्हावा, या उद्देशाने ही परवानगी देण्यात आली आहे.
गोरक्षनाथांच्या आख्यायिकेशी जोडली गेली नागपूजेची परंपरा
शिराळ्यातील नागपंचमीला मोठी ऐतिहासिक व धार्मिक परंपरा आहे. आख्यायिकेनुसार, गोरक्षनाथ एकदा शिराळ्यातील महाजन यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आले होते. भिक्षा देण्यास उशीर का झाला, अशी विचारणा केल्यानंतर महाजन यांच्या पत्नीने आपण मातीच्या नागाची पूजा करत असल्याचे सांगितले. त्यावेळी गोरक्षनाथांनी जिवंत नागाची पूजा करण्यास सांगितल्याचे मानले जाते. त्यानंतर शिराळ्यात जिवंत नागपूजेची परंपरा सुरू झाल्याची आख्यायिका आहे.

मात्र वन्यप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाच्या आदेशामुळे २००२ पासून शिराळ्यात जिवंत नागाची पूजा करण्याऐवजी प्रतिकात्मक नागाची पूजा केली जाते. त्यामुळे आजही शिराळ्यातील महिला घराघरांत प्रतिकात्मक नागाच्या प्रतिमेची पूजा करून नागपंचमी साजरी करतात.
गेल्या काही वर्षांपासून नागांचे पर्यावरणातील महत्त्व आणि सर्पसंवर्धनाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने वन्यजीव विभागाकडून ठराविक अटी व शर्तींच्या अधीन राहून निवडक ग्रामस्थ व मंडळांना जिवंत नागांच्या प्रदर्शनासाठी परवानगी दिली जात आहे.
अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांची गर्दी
नागपंचमीच्या निमित्ताने शिराळ्यातील अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पारंपरिक वेशभूषेत महिला नागपूजेसाठी मंदिर परिसरात दाखल होत आहेत. शहरातील विविध भागांत नागपंचमीचा उत्साह पाहायला मिळत असून, जिवंत नागांच्या प्रदर्शनामुळे या उत्सवाचे विशेष आकर्षण निर्माण झाले आहे.
परंपरा, श्रद्धा आणि सर्पसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या शिराळ्यातील नागपंचमीकडे यंदाही हजारो भाविकांचे लक्ष लागले असून, संपूर्ण शिराळा नगरी नागपंचमीच्या उत्साहाने फुलून गेली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!