

करवीर प्रतिनिधी : शाळा व महाविद्यालय परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तरुण वाहनधारकांवर करवीर पोलीस ठाणे व निर्भया पथकाने संयुक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. कोपार्डे-कुडित्रे फाटा, स. ब. खाडे महाविद्यालय, श्रीराम हायस्कूल तसेच अन्य शाळा-महाविद्यालय परिसरात पोलिसांनी विशेष वॉच ठेवला आहे.
या मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करून त्यांना दंड ठोठावण्यात आला. तसेच तरुणांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत समज देण्यात आली.
दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी १९ कारवायांमधून १६ हजार ३०० रुपये दंड, तर दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी २७ कारवायांमधून ५२ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दोन दिवसांत एकूण ४६ कारवाया करून ६८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शाळा-महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींची सुरक्षितता तसेच वाहतूक शिस्त कायम राहावी, यासाठी ही कारवाई नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस हवालदार प्रमोद पाटील, सुमित्र पवार तसेच निर्भया पथकाच्या निशाराणी बुवा व शर्मिला जाधव यांनी सहभाग घेतला.











