Edition

महाराष्ट्राच्या राजकीय-शैक्षणिक क्षेत्रातील ‘ज्ञानदीप’ विझला! ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; वयाच्या ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटविणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल तथा पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (डॉ. डी. वाय. पाटील) यांचे आज कोल्हापूर येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक ज्येष्ठ, अनुभवी आणि कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात राजकारणासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही भरीव योगदान दिले. महाराष्ट्रात मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर राज्यपाल म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले.
‘शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन’ या विचारातून त्यांनी महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत अनेक शैक्षणिक संस्थांची उभारणी केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे असंख्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आणि अनेक पिढ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळाली.
राजकीय क्षेत्रात सक्रिय असतानाच सामाजिक बांधिलकी आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाला त्यांनी कायम प्राधान्य दिले. त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने केवळ एक ज्येष्ठ राजकीय नेता नव्हे, तर शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविणारा दूरदृष्टीचा शिल्पकार हरपला, अशी भावना व्यक्त होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!