

पंढरपूर : आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांची झालेली गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा अत्यंत प्रभावी नियोजन करत यात्रेकरूंसाठी सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासाची उत्कृष्ट व्यवस्था उभारली. २४ ते २६ जुलै या तीन प्रमुख दिवसांत मध्य रेल्वेने १०० विशेष व नियमित रेल्वे सेवा चालवत १ लाख १३ हजार १९७ वारकऱ्यांचा प्रवास यशस्वीपणे पार पाडला. गेल्या वर्षीच्या तुलनेत गाड्यांची संख्या आणि प्रवाशांची संख्याही वाढली आहे.
यात्रेकरूंची वाढती गर्दी लक्षात घेऊन २४ जुलै रोजी ३५, २५ जुलै रोजी ३४ आणि २६ जुलै रोजी ३१ अशा एकूण १०० रेल्वे सेवा चालविण्यात आल्या. एकाच ट्रॅकवर प्रभावी नियोजन करत ही मोहीम यशस्वी करण्यात आली.
पंढरपूर स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी पाच अतिरिक्त तिकीट बुकिंग काउंटर, पाच स्वयंचलित तिकीट विक्री यंत्रे (ATVM), दहा मोबाईल अनारक्षित तिकीट प्रणाली (MUTS) तसेच RailOne ॲपद्वारे मोबाईल तिकीट सुविधेला प्रोत्साहन देण्यात आले. गर्दी नियंत्रणासाठी मजबूत बॅरिकेडिंग, शास्त्रीय रांग व्यवस्था आणि पादचारी पुलावर विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या.
वारकऱ्यांच्या विश्रांतीसाठी स्थानक परिसरात १२,३३० चौरस मीटरचे कायमस्वरूपी जलरोधक प्रतीक्षा क्षेत्र उपलब्ध करून देण्यात आले असून यावर्षी अतिरिक्त १,३२० चौरस मीटरचे नवीन प्रतीक्षा क्षेत्र उभारण्यात आले. तसेच मालगोदामात ३,००० चौरस मीटरचे आच्छादित क्षेत्र विकसित करण्यात आले.
स्वच्छतेलाही विशेष प्राधान्य देत विद्यमान ८४ शौचालयांसोबत १०४ तात्पुरती शौचालये उभारण्यात आली. २४ तास स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
सुरक्षेच्या दृष्टीने ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सज्ज आधुनिक कमांड अँड कंट्रोल सेंटर कार्यरत होते. हिंदी, मराठी, इंग्रजी आणि कन्नड भाषांमधून माहिती देण्यासाठी व्हिडिओ वॉल, ट्रेन माहिती फलक आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीची व्यवस्था करण्यात आली. वैद्यकीय पथकाने या कालावधीत १,२१९ यात्रेकरूंना तातडीचे वैद्यकीय सहाय्य पुरवले.
रेल्वे कर्मचारी, रेल्वे संरक्षण दल (RPF), शासकीय रेल्वे पोलीस (GRP), नागरी संरक्षण स्वयंसेवक आणि विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे वारी व्यवस्थापन यशस्वी केले. विशेष गाड्यांच्या वेळेवर संचालनासाठी चार स्क्रॅच रेक्सही सज्ज ठेवण्यात आले होते.
याशिवाय विविध स्वयंसेवी संस्था आणि धर्मादाय संस्थांनी सुमारे एक लाख वारकऱ्यांना मोफत अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
यशस्वी आषाढी वारीनंतर मध्य रेल्वेने सर्व वारकरी, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था आणि सहकार्य करणाऱ्या सर्व विभागांचे आभार मानत, भविष्यातही यात्रेकरूंना सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार रेल्वे सेवा देण्याची ग्वाही दिली.









