नाशिक वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यात सलग घडणाऱ्या भूगर्भीय घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका बाजूला सुरगाणा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असताना, दुसरीकडे इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथे डोंगराचा मोठा भाग खचल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन घटनांचा थेट संबंध नसल्याचे प्राथमिक स्तरावर दिसत असले, तरी भूगर्भातील हालचालींच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांचे लक्ष या भागाकडे वेधले गेले आहे.
सुरगाणा, पेठ आणि दिंडोरी तालुक्यात मागील तीन दिवसांपासून भूगर्भात सौम्य हालचाली होत असल्याची नोंद आहे. सुरगाण्यातील बोरगाव परिसरात सोमवारी रात्री पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्यांनंतर अनेक शेतजमिनींमध्ये मोठ्या भेगा पडल्या असून, त्या भेगांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे जमीन आणखी खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी परिसरात सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील डोंगराचा काही भाग अचानक कोसळला. डोंगरात मोठी चीर पडून त्यातून पाण्याचा वेगवान प्रवाह सुरू झाला. या प्रवाहासोबत मोठमोठे दगड, माती आणि मुरूम खाली येऊन वनपट्टाधारक तसेच खासगी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पसरले. परिणामी अनेक एकर शेती खरवडून निघाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू केले असून शेतीचे नुकसान, डोंगराची स्थिती आणि पुढील संभाव्य धोका याचा अभ्यास केला जात आहे.
सुरगाण्यातील भूकंपाचे धक्के आणि इगतपुरीतील डोंगर खचण्याची घटना यांचा थेट संबंध अद्याप स्पष्ट झालेला नसला, तरी मुसळधार पाऊस, भूपृष्ठावरील बदल आणि भूगर्भातील हालचाली या पार्श्वभूमीवर या घटनांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. तज्ज्ञांच्या अहवालानंतरच या घटनांमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.









