Edition

यड्रावमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त मातृ-पितृ पूजन, गुरुपूजन व सरस्वती पूजनाचा भव्य सोहळा; बाल संस्कार केंद्राचा प्रेरणादायी उपक्रम.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

यड्राव (प्रतिनिधी ) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणीत) यांच्या अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र, शाखा मारुती मंदिर, यड्राव यांच्या वतीने परमपूज्य स्वामी समर्थ स्वरूप गुरुमाऊली तसेच आदरणीय नितीन भाऊ यांच्या आशीर्वादाने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला मातृ-पितृ पूजन, गुरुपूजन आणि सरस्वती पूजन हा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
दिनांक २६ जुलै रोजी संपूर्ण देशासह परदेशात कार्यरत असलेल्या बाल संस्कार केंद्रांमध्ये हा उपक्रम प्रथमच एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आला. या ऐतिहासिक उपक्रमात यड्राव शाखेनेही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
सकाळी ८.०० वाजता श्री स्वामी समर्थांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभर विविध सेवा, पूजन विधी आणि संस्कारमूल्यांवर आधारित उपक्रम पार पडले. या कार्यक्रमाला बाल संस्कार वर्गातील विद्यार्थी, त्यांचे पालक, गुरुजन, सेवेकरी तसेच गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यड्रावसह परिसरातील गावांमध्येही या लहानबालकांचे संस्कारपूर्ण सहभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संध्याकाळी चारनंतर बाल संस्कार वर्गातील चिमुकल्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात भव्य दिंडी सोहळा काढली . पारंपरिक वेशभूषेतील बालकांचा उत्साह, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या दिंडीमध्ये महिला सेवेकऱ्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग लाभला.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत केवळ अध्यात्मिक कार्यच नव्हे, तर ८० टक्के समाजकार्य आणि २० टक्के अध्यात्मिक कार्य या संकल्पनेतून बाल संस्कार, युवा प्रबोधन तसेच विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. बालकांमध्ये संस्कार, राष्ट्रप्रेम, कुटुंबमूल्ये आणि आध्यात्मिक जाणीव रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या केंद्रामार्फत होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आयोजित हा संस्कारमय उपक्रम यड्राव परिसरासाठी प्रेरणादायी ठरला असून, समाजात संस्कार, सेवा आणि अध्यात्माची उज्ज्वल परंपरा अधिक दृढ करण्यास निश्चितच हातभार लावणारा ठरला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!