
कोल्हापूर प्रतिनिधी
उदय साळुंखे,
उजळाईवाडी, ता. १४ : पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहापदरीच्या कामात कणेरीवाडी बस थांब्याजवळ कालव्याची पाईपलाईन फुटल्याने काही दिवसांपासून अखंड पाण्याची गळती सुरू आहे. या गळतीमुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सेवा रस्त्यावरून हे पाणी वाहत असल्याने वाहनधारकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे.
नेलीं, विकासवाडी परिसरातील शेतीसाठी आणि काही भागांतील पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी कणेरीवाडी तलावातून या कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या कालव्यामुळे वर्षभर सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने परिसरातील
शेतकऱ्यांसाठी तो वरदान ठरला आहे. मात्र, महामार्गाच्या कामादरम्यान झालेल्या नुकसानीमुळे या पाणीपुरवठ्याच्या नियमिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, माजी आमदार ऋतुराज पाटील
यांच्या पुढाकारातून सुमारे अडीच कोटी रुपये खर्चुन या कालव्याचे अस्तरीकरण केले होते. त्यानंतर अखंडित व मुबलक पाणीपुरवठा सुरू झाल्याने शेतकऱ्यांची सोय झाली होती, अशी माहिती गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी दिली.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे विचारणा केली असता, या गळतीची माहिती मिळालेली नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव आणि कामाच्या देखरेखीतील त्रुटी यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. गळतीची तातडीने दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी केली आहे.
कणेरीवाडी येथील बस थांब्याजवळ महामार्गालगत कालव्याच्या पाईपलाईनला झालेल्या गळतीमुळे सेवा रस्त्यावर पाणी वाहत आहे.
इंटेक व्हॉल्व्हच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी तलावातील पाण्याची पातळी कमी करणे आवश्यक आहे. कोणताही अनर्थ टाळण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात जयपाणी सोडण्यात येत असून, इंटेक व्हॉल्व्हची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग कमी करण्यात येईल.
-श्री. कडतरे, कालवा निरीक्षक, जलसंपदा विभाग
कालव्याद्वारे पाणी सोडण्याच्या वेळेत गळतीतून पाणी महामार्गावर वाहते. लाखो लिटर पाण्याचा अपव्यय तर होतोच, शिवाय सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी संयुक्तपणे तातडीने दुरुस्ती करावी.
<span;><span;>- प्रदीप केसरकर, सामाजिक कार्यकर्त
े











