Edition

भाटशिरगांव येथे ओढ्यात ट्रक कोसळला युवकांच्या ३ तासांच्या मदतकार्यामुळे चालक बचावला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली प्रतिनिधी – भाटशिरगांव (ता. शिराळा) येथे रात्री १०:१५ च्या सुमारास (दि. ०६) रत्नागिरीहून शिराळ्याच्या दिशेने चिरा वाहतूक करणारा १६ चाकी ट्रक (KA 35C 8952) आवळ ओढ्यात पडला. भाटशिरगांव आणि बिऊर गावच्या हद्दीवर हा ओढा आहे. सततच्या पावसामुळे ओढ्यातून पाणी मोठ्या प्रमाणा वाहत होते. जवळपास १५०० चिरा घेऊन जात असलेला ट्रक ओढ्यात पूर्वेच्या बाजूला आडवा पडल्यामुळे ट्रकमधील चिरे पात्रात पडले. ट्रक ओढ्यात पडल्यावर क्लिनर कसाबसा बाहेर आला, मात्र चालक अडकला. चालकाचा पाय ब्रेकजवळ अडकल्याने त्याला बाहेर निघता येत नव्हते. अशा परिस्थितीत अपघाताची माहिती मिळताच भाटशिरगांवच्या युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व प्रत्यक्ष मदतकार्यास सुरुवात केली.

भाटशिरगांवचे स्थानिक युवक ट्रकद्वारे चिरा, बगॅस वाहतूकीच्या व्यवसायात असल्याने त्यांच्या अनुभवाचा उपयोग झाला. घटनास्थळी बिऊर येथील दोन जेसीबी मशीन्सना पाचारण करण्यात आले. मात्र दोन जेसीबी मशीन्स लावूनही ट्रक हलला नाही. एका बाजूला पाण्याचा खळखळाट. ट्रकच्या केबीनमध्ये पाणी घुसल्याने चालक बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती. “मला बाहेर काढा…” असे चालक ओरडत होता. मध्यरात्र उलटून गेली तरी मदतकार्य सुरूच होते. घटनास्थळी जेसीबी आणि क्रेन रस्त्यावरच आडवी असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे लोकांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस, शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली होती.

दोन जेसीबी मशीन्सद्वारे ट्रक उचलत नसल्याने अखेर उपस्थितांनी शिराळा औद्योगिक वसाहतीमधून क्रेन बोलावली. मात्र क्रेन आणि दोन जेसीबी मशीन लावूनही ट्रक फारसा उचलत नव्हता. याउलट ट्रकच्या वजनामुळे क्रेन आणि जेसीबी मशीन मागून उचलायला लागले. यानंतर मात्र उपस्थित लोक वजनासाठी जेसीबीच्या रोडरमध्ये आणि क्रेनच्या पुढील बाजूवर उभे राहिले. यामुळे ट्रक वीतभर वर उचलण्यात यश आले. यावेळी युवकांनी शिताफीने चालकाला केबीनमधून बाहेर काढले. मध्यरात्री १२:३४ मिनिटांनी चालकास युवकांनी बाहेर काढले आणि उपस्थितांनी “जोतिबाच्या नावानं चांगभलं, अंबाबाईच्या नावानं चांगभलं..” असा एकच गजर करत सुटकेचा निःश्वास टाकला. चालकाच्या अडकलेल्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. चालकास शासकीय रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. मदतकार्याप्रसंगी भाटशिरगांवच्या युवकांनी दाखवलेली अभूतपूर्व एकजुट आणि समाजशील वृत्तीचे सर्वांनी कौतुक केले. प्रत्यक्ष मदतकार्यात दत्तात्रय देसाई, सुखदेव आलुगडे, दिपक मोरे, उमेश पवार, प्रतिक साळुंखे, लालासो घोलप, सागर सोनटक्के, शनिराज आलुगडे, विश्वदिप देसाई, राजवर्धन ग. देसाई, राजवर्धन म. देसाई, सागर कदम, जेसीबी मशीन मालक सदाशिव पाटील, दत्तात्रय पाटील, सागर देसाई, संदिप गुरव आदी सहभागी झाले होते. घटनास्थळी भाटशिरगांवचे सरपंच भगवान भंडारे, पोलीस पाटील सचिन गुरव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील, हवालदार अनुज पाटील, कॉन्स्टेबल सचिन कांबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती
दिवसभर पावसाची उघडीप असल्यामुळे आवळ ओढ्यातील पाण्याची पातळी कमी होती. अन्यथा ट्रक थेट पाण्यात बुडाला असता. शिवाय भाटशिरगांव येथील युवकांचे प्रसंगावधान, तातडीने उपलब्ध झालेली जेसीबी मशीन्स व क्रेन यामुळे चालकाचे प्राण वाचले.

दुसरा ट्रकही ओढ्यात जाता जाता बचावला
घटनास्थळी सदर बचाव कार्य सुरु असतानाच, रत्नागिरीहून शिराळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने चिरा वाहतूक करणारा दुसरा ट्रक ओढ्यावर वाहतूक कोंडी अचानक दिसल्याने वळणावरुन ओढ्याच्या दिशेला घसरला. मात्र चालकाने ब्रेक लावल्याने अपघात टळला. दोन जेसीबी मशीन्सद्वारे हा ट्रक देखील खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!