ऐतवडे खुर्द प्रतिनिधी – शक्तिपीठ महामार्गाविरोधातील लढा आता अधिक तीव्र करण्यात येणार असून, ७ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बि.जी.पाटील (काका) यांनी केले. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा जनतेसमोर त्यांना जाब द्यावा लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
अनेक लोकप्रतिनिधी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगत असले तरी उघडपणे भूमिका घेण्यास टाळाटाळ करत आहेत. शक्तिपीठ महामार्गामुळे कराड, पाटणसह संपूर्ण परिसरातील सुपीक शेती, गावांचे अस्तित्व आणि हजारो कुटुंबांचे भविष्य धोक्यात येणार असल्याने हा लढा केवळ एका गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण भागाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी निर्णय लादण्याची भूमिका घेतल्याचा आरोप करत, लोकशाहीत संवादाचे दरवाजे बंद होत असतील तर जनआंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
७ जुलैच्या आंदोलनासाठी महिला, युवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा दावा करत गावागावांत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे शक्तिपीठ महामार्गाविरोधातील ठरावही शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गावागावांत सायंकाळी एकत्र येऊन आंदोलनाची तयारी करण्याचे, तिरंगा हाती घेऊन जनजागृती वाढविण्याचे आवाहनही या सभेत करण्यात आले.











