
चिकोडी प्रतिनिधी अमर माने – निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावरील कब्बूर टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या खोल जागेत घसरून झुडपात आदळल्याने हा अपघात घडला.
या अपघातात शीला श्रीपती घाटे (वय 65) आणि राजेंद्र शंकर पाटील (वय 49) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोहन घाटे आणि प्रदीप घाटे (सर्व रा. मालिकवाड, ता. चिकोडी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटे कुटुंबीय आपल्या कारमधून मालिकवाड येथून घटप्रभाकडे जात होते. दरम्यान, निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावरील कब्बूर टोल नाक्याजवळ आल्यानंतर चालक राजेंद्र पाटील यांचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल जागेत घसरून पलटी झाली. त्यानंतर कार पुढे जाऊन झुडपाला जोरदार धडकली.
या भीषण अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारमधील शीला घाटे आणि चालक राजेंद्र पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
तर मोहन घाटे आणि प्रदीप घाटे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच चिकोडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अपघाताच्या कारणांचा पुढील तपास सुरू केला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे मालिकवाड गावावर शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.













