Edition

फार्णेवाडी–रेठरे हरणाक्ष परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली प्रतिनिधी – वाळवा तालुक्यातील फार्णेवाडी–रेठरे हरणाक्ष परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वारंवार वावर आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास गावालगतच्या शेतात बिबट्या दिसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर रात्री साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान फार्णेवाडी–रेठरे हरणाक्ष पुलाजवळ काही युवकांना पुन्हा बिबट्या दिसल्याचा दावा करण्यात आला.
स्थानिकांच्या माहितीनुसार, हा बिबट्या गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात वावरत असून, गेल्या वर्षीही अशाच प्रकारे त्याचे दर्शन झाले होते. त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली होती, मात्र वरिष्ठ स्तरावरील परवानगीशिवाय पुढील कारवाई शक्य नसल्याचे सांगण्यात आले होते.
बिबट्याच्या वारंवार दर्शनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी फिरण्यासाठी किंवा व्यायामासाठी बाहेर पडणारे नागरिक, तसेच शाळा आणि खासगी क्लाससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. गुरुवारी सकाळीही काही नागरिकांना बिबट्या दिसल्याची माहिती समोर आल्याने भीती अधिक वाढली आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!