
हुपरी प्रतिनिधी – हुपरी नगरपरिषद अंतर्गत कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखिल भारत हिंदू महासभा,शहर हुपरी यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.कंत्राटी सफाई कामगार गेल्या आठ दिवसांपासून नगर परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत असून, दि. २२ जुलै २०२६ पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे, थकीत वेतन तात्काळ अदा करावे, ईपीएफ, ईएसआय व इतर वैधानिक सुविधा लागू कराव्यात, स्थानिक कामगारांना प्राधान्य द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला विरोध करत गावातील कामगारांना डावलून बाहेरील कामगार आणुन सहा ते दहा कामगारांच्या वर काम सुरू असल्याचे निदर्शनास आले याला विरोध करत
अखिल भारत हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांची भेट घेऊन कामगारांच्या मागण्यांबाबत निवेदन सादर केले. शासनाच्या किमान वेतन आदेशानुसार कंत्राटी कामगारांना निश्चित वेतन देणे बंधनकारक असून, त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कामात दिरंगाई व दिलेल्या ठेका ठेक्या चे काम आठ दिवस उशीरा केल्याने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच सफाई कामगारांच्या कंत्राटी निविदा प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. निविदेतील काही अटी विशिष्ट कंत्राटदाराला लाभदायक असल्याची तक्रार करत संपूर्ण निविदा प्रक्रियेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
हुपरी शहरातील अनेक सफाई कामगार गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ सेवा बजावत असून, अनेक वेळा वेतन रखडूनही त्यांनी शहराची स्वच्छता व्यवस्था कायम ठेवली आहे. अशा अनुभवी स्थानिक कामगारांना डावलून बाहेरील कामगारांना प्राधान्य दिले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
कामगारांच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने देण्यात आला. शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हुपरी नगर परिषद कार्यालयासमोर हालगीच्या गजरात सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष मंगळराव माळगे, उपनगराध्यक्ष प्रकाश रणदिवे, मुख्याधिकारी अजय नरळे, अमेय जाधव, नगरसेवक स्वप्निल हुपरीकर, अखिल भारत हिंदू महासभेचे उपजिल्हाप्रमुख रमेश भोरे, शहरप्रमुख संजय पाटील, सुहास माने, दादासो कामते, भरत देसाई, संदीप भंडारे, सचिन सादळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, सफाई कामगार व नागरिक उपस्थित होते.










